Header Ads

washim agricultural department news : suggestions for soyabean crop

washim agriculture department news karanja manora risod malegaon magnru[ir

सोयाबीन पिकाच्या संरक्षणासाठी उपाययोजना करा -  कृषि विभागाचा सल्ला

          वाशिम, दि. ०१ (जिमाका) : कृषि विभागामार्फत क्रॉपसॅप योजनेंतर्गत खरीप हंगामात कीड व रोग्चे सर्वेक्षण क्षेत्रीय अधिकारी, कर्मचाऱ्यांमार्फत सुरु करण्यात आले आहे. सध्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंगा व तंबाखूवरील पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव अल्प प्रमाणात दिसून येत आहे. यापासून सोयाबीन पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकऱ्यांनी उपाययोजना करण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.

          मादी चक्रीभुंगा हा पानाच्या देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करतो. यामध्ये मादी तीन छिद्र करते व त्यापैकी एका छिद्रामध्ये अंडी घालते. अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरून पोकळ करीत जाते. ही अळी १९ ते २२ मी.मी. लांब, पिवळसर गुळगुळीत असून तिच्या शरीरावर उभट भाग दिसतात. चक्रीभुंग्यांच्या प्रादुर्भावामुळे फुलधारणा, शेंगा धारणा, दाणे भरण्याच्या प्रमाणात ५३ ते ६६ टक्के घट येवू शकते. लवकर पेरणी केलेल्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो.

          ज्या सोयाबीन पिकावर चक्रीभुंग्यांचा प्रादुर्भाव झालेला आहे, अशा सोयाबीन पिकाच्या देठावर, फांदीवर चक्राकार दोन काप केल्यामुळे कापाच्या वरच्या भागातील पान वाळून जाते. शेतामध्ये सोयाबीन पिकाचे एक मीटर ओळीमध्ये प्रादुर्भावग्रस्त झाडांचे निरीक्षण घेवून ३ ते ५ प्रादुर्भावग्रस्त झाडे आढळून आल्यास प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी जर प्रति मीटर ओळीत ५ पेक्षा जास्त नुकसानग्रस्त झाडे आढळून आल्यास केंद्रीय कीटकनाशक मंडळाद्वारे लेबल क्लेम केलेल्या शिफारशीनुसार प्रोपॅनोफॉस ५० इसी २० मिली, थायक्लोप्रिड २१.७ एसी १५ मिली किंवा इथिऑन ५० इसी १५-३० मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी.

          सोयाबीन पिकावर तंबाखूची पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यात होतो. ही अळी मळकट हिरव्या रंगाची असून शरीरावर पिवळसर नारंगी रेषा व काळे ठिपके असतात. पूर्ण वाढ झालेली अळी ३० ते ४० मिमी लांब असून मादी पतंग पुंजक्याने अंडी घालतात. एक मादी पतंग एकावेळी ३०० पर्यंत अंडी घालतो. अंड्यातून निघालेल्या अळ्या सामुहिकपणे पानातील हरितद्रव्य खातात. त्यामुळे पाने जाळीदार दिसतात. तिसऱ्या अवस्थेतील अळ्या वेगवेगळ्या होवून सोयाबीनची पाने खातात. पूर्ण वाढ झालेली अळी जमिनीमध्ये कोषावस्थेत जाते.

          तंबाखूची पाने खाणारी अळी १५० हून अधिक वेगवेगळ्या वनस्पतींची पाने खाऊन आपली उपजीविका करते. त्यामुळे या अळीचे जीवनचक्र तोडणे फार कठीण आहे. ही अळी मुख्यतः रात्रीच्या वेळी पाने खावून दिवसा पानाच्या आड लपते. त्यामुळे सहज निरीक्षण करणे अवघड जाते. ह्या अळीपासून सोयबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होवू शकते. ह्या अळीचे नियंत्रण प्रथम अवस्थेत करणे अधिक फायदेशीर आहे.

          प्रथम अवस्थतेत ही अळी एकाच पानावर पुंजक्याने आढळून येते. ह्या अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी पीक फुलावर येण्यापूर्वी ३ ते ४ लहान अळ्या प्रति मीटर ओळीत आढळल्यास लेबल क्लेम शिफारशीत इंडोक्सीकार्ब ११.८ ए.सी. ६.६. मिली किंवा स्पायनेवोरम ११.७ ए.सी. ९ मिली यापैकी कोणतेही एक कीटकनाशक १० लिटर पाण्यात घेवून फवारणी करावी. ह्या कीटकनाशक फवारणीसाठी पॉवर स्प्रे पंपाचा वापर करावयचा असल्यास औषधांचे प्रमाण तिप्पट वाढवावे. कीटकनाशक फवारणी करण्यापूर्वी आर्थिक नुकसानीची पातळी तपासून घ्यावी, आर्थिक नुकसान पातळीच्या वर किडीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास फवारणी करावी.

          तणनाशके फवारणीसाठी वापरलेला पंप कीटकनाशक फवारणीसाठी वापरू नये. कीटकनाशक फवारणी करतांना पाण्याचा सामू आम्लयुक्त (७ पेक्षा कमी) असावा. फवारणी शक्यतोवर वारा शांत असतांना सकाळी किंवा सायंकाळी करावी. फवारणी करणारी व्यक्ती निर्व्यसनी असावा. फवारणी करताना सेफ्टी कीटचा वापर करूनच फवारणी करावी, जेणेकरून विषबाधा टाळता येईल, असे श्री. तोटावार यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.