Header Ads

‘काँट्रॅक्ट ट्रेसिंग’द्वारे बाधितांचा शोध घ्या : विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांचे प्रशासनाला निर्देश

‘काँट्रॅक्ट ट्रेसिंग’द्वारे बाधितांचा शोध घ्या 

विभागीय आयुक्त  पीयूष सिंह यांचे प्रशासनाला निर्देश 

कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा

     वाशिम, दि. १७ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या वाढली असून संसर्गाचे प्रमाण कमी करण्यासाठी बाधितांचा वेळीच शोध घेवून त्यांचे अलगीकरण करणे आवश्यक आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाधित रुग्णांच्या संपर्कातील प्रत्येक व्यक्तीची माहिती घेवून त्याची कोरोना विषयक चाचणी करण्यावर भर देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, १७ जुलै रोजी आयोजित कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
     यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, अपर जिल्हाधिकारी शरद पाटील, आरोग्य सेवा उपसंचालक डॉ. फारुखी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, राजेंद्र जाधव, सुहासिनी गोणेवार, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिता आंबरे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था श्री. गडेकर, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांची उपस्थिती होती.
     श्री. सिंह म्हणाले, जिल्ह्यातील गरोदर महिला, निवडक प्रतिबंधित क्षेत्रातील अतिजोखमीचे आजार असलेल्या व्यक्ती, तसेच बाधित व्यक्तींच्या नजीकच्या संपर्कात आलेल्या प्रत्येक व्यक्तीची कोरोना विषयक तपासणी होणे आवश्यक आहे. जेणेकरून कोरोना संसर्गाचे लवकरात लवकर निदान होवून त्यांच्यावर उपचार सुरु करणे शक्य होईल. तसेच कोरोना संसर्गाची लक्षणे असलेले काही रुग्ण उशिरा समोर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जिल्ह्यात अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी स्वतःहून पुढे येण्यासाठी प्रयत्न करावेत. विशेषतः ज्यांना हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह असे अतिजोखमीचे आजार असलेल्या लोकांवर विशेष लक्ष ठेवावे.
     कोरोना बाधित रुग्णांना घरी सोडल्यानंतर सुद्धा त्यांच्या आरोग्यविषयक परिस्थितीबाबत पाठपुरावा करावा. तसेच त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास होत असल्यास त्वरित आरोग्य सुविधा पुरविण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर, कोविड रुग्णालयातील बेड संख्या वाढविण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात. प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या पोलिसांना एन-९५ मास्क, फेसशिल्ड उपलब्ध करून द्यावे. तसेच त्यांची अँटीजेन टेस्ट करण्यात यावी. पोलिसांची पल्स ऑक्सोमीटर व थर्मल गनद्वारे नियमित आरोग्य तपासणी करण्याच्या सूचनाही श्री. सिंह यांनी यावेळी दिल्या.
     जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी कोरोना सद्यस्थितीबाबत माहिती दिली. अँटीजेन टेस्टमुळे कोरोना बाधितांचे लवकर निदान होवून त्यांना लवकर उपचार मिळत आहेत. ज्याठिकाणी जास्त संसर्गाचा धोका आहे, अशा प्रतिबंधित क्षेत्रात अँटीजेन टेस्टद्वारे तपासणी करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पोलिसांसाठी स्वतंत्र २० खाटांचे कोविड केअर सेंटर पोलीस मुख्यालयामध्ये सुरु करण्यात येत असल्याचे सांगितले.
     पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी लॉकडाऊन काळात पोलीस विभागाने केलेल्या कार्यवाहीची माहिती दिली. तसेच जिल्ह्यात काही पोलीस कोरोना बाधित आढळले असून पोलिसांची कोरोना विषयक चाचणी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मंगरूळपीर, वाशिम येथील कोविड केअर सेंटरला भेट

     विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज मंगरूळपीर व वाशिम येथील जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कोविड केअर सेंटरला भेट देवून तेथील सुविधांची माहिती घेतली. तसेच या ठिकाणी अँटीजेन टेस्टसाठी तयार करण्यात आलेल्या कक्षाची पाहणी केली. कोविड केअर सेंटरमध्ये ठेवण्यात येणाऱ्या संशयित व बाधित व्यक्तींची योग्य काळजी घेण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

No comments

Powered by Blogger.