Header Ads

प्रस्तावित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून वंचित वाशिम जिल्ह्याकरीता उपकालवा देण्यात यावा - मा.आ.प्रकाश डहाके

प्रस्तावित वैनगंगा-नळगंगा नदीजोड प्रकल्पातून वंचित वाशिम जिल्ह्याकरीता उपकालवा देण्यात यावा 

माजी आ.प्रकाश डहाके यांची जलसंपदा मंत्री ना.जयंत पाटील यांचेकडे मागणी 

कारंजा (जनता परिषद) दि.१७ - भंडारा जिल्ह्यातील वैनगंगा व बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा या विदर्भाकरीता अतिशय महत्वाकांक्षी असलेल्या नदीजोड प्रकल्पास प्रशासकीय मान्यता देण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरु आहेत. त्या प्रस्तावात सिंचनाचे दृष्टीने वंचित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील कारंजा व मानोरा तालुक्याकरीता एका उपकालव्याचे नियोजन मुळ प्रस्तावात अंतर्भूत करण्यात यावे, अशी मागणी कारंजाचे लोकनेते व माजी आ.प्रकाशदादा डहाके यांनी ना.जयंत पाटील यांना एका पत्राद्वारे केली आहे.
वैनगंगा नदीवरील गोसीखुर्द प्रकल्पाचे २७२१ द.ल.घनमिटर पाणी अखर्चित आहे. त्यापैकी १९१० द.ल.घनमिटर पाणी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याचे आहे. हे पाणी ४७८ कि.मी.लांबीच्या कालव्याद्वारे बुलढाणा जिल्ह्यातील नळगंगा नदीपर्यंत वळते करुन विदर्भातील सिंचनाचा अनुशेष दुर करण्याचा अतिशय महत्वाकांक्षी प्रकल्प मंजूर करण्याचे दृष्टीने शासनाच्या हालचाली सुरु आहेत. यांतील १९४ कि.मी.चा कालवा नागपूर विभागातून जात असून २८४ कि.मी.चा कालवा अमरावती जिल्ह्यातून जाणार आहे. या वळण कालव्यामध्ये तीन टप्प्यात ८० द.ल.घनमिटर उपसा प्रस्तावित आहे. यासाठी २२४ मेगावॅट क्षमतेचे संच लागणार आहेत. उर्वरित दहा उपकालव्यांपैकी उमरेड, बोर व रोहणा हे तीन उपकालवे नागूर विभागातून आहेत तर निम्न वर्धा, बेंम्बळा, उमा, काटेपुर्णा व मण असे उपकालवे अमरावती विभागातून प्रस्तावित आहेत. 
प्राथमिक अंदाजानुसार पिण्याचे पाणी व औद्योगीक गरजा भागवून २.९० लाख हेक्टर जमिनीच्या सिंचनाचे उद्दीष्ट या प्रकल्पातून साध्य होऊ शकते. त्यामुळे विदर्भासाठी हा प्रकल्प जलसंजीवनी ठरु शकतो. 
सिंचनाचे दृष्टीने नेहमीच उपेक्षीत राहिलेला वाशिम जिल्हा या ही वेळी उपेक्षीत राहु नये याकरिता आपण कटीबद्ध असल्याचे मत डहाके यांनी व्यक्त केले आहे. वाशिम जिल्ह्यातून अरुणावती, पुस, काटेपुर्णा, अडाण व बेंम्बडा या पाच नद्यांचा उगम झालेला आहे. परंतू ह्या नद्यांवरील धरणे जिल्ह्याच्या सीमेवर व बाहेर झालेली असल्याने जिल्ह्याला याचा फायदा मिळू शकलेला नाही व नदीच्या पाण्याच्या आरक्षणामुळे भविष्यात या नद्यांवर धरण होणे शक्य नाही. त्यामुळे वाशिम जिल्ह्यात सिंचनाचा अनुशेष आहे. त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील गोदावरी-तापी खोर्‍याच्या रिजलाईनवर एका अतिरिक्त उपकालव्याचे नियोजन मुळ प्रशासकीय मान्यता प्रस्तावात अंतर्भूत करण्यात येण्याची मागणी माजी आ.प्रकाश डहाके यांनी केली आहे. 

No comments

Powered by Blogger.