Header Ads

राज्यातील पोलीस भरतीला वेग :१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार - गृहमंत्री अनिल देशमुख

राज्यातील पोलीस भरतीला वेग

१२ हजार ५३८ पदांची भरती प्रक्रिया डिसेंबर पर्यंत पूर्ण करणार 

गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विभागाला सूचना 

     मुंबई (महासंवाद द्वारा ) दि.१८ : राज्यातील पोलिस दलामध्ये विविध पदांवर जवळपास १२ हजार ५३८ पदांच्या भरतीसाठी तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना विभागाला देण्यात आल्या आहेत. डिसेंबर अखेर ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
     या संदर्भातील एक बैठक नुकतीच मंत्रालयात संपन्न झाली. या बैठकीस गृह विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, अपर मुख्य सचिव डॉ.संजय चहांदे, वित्त विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायसवाल, प्रधान सचिव (विशेष) अमिताभ गुप्ता उपस्थित होते.
    सध्याच्या काळामध्ये पोलीस विभागाने अत्यंत महत्त्वाचे कार्य केलेले आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस शिपाई वर्गातील पदांची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे या संवर्गातील १००% टक्के रिक्त पदे भरणे आवश्यक आहे. पोलीस शिपाई गट-क संवर्गातील २०१९ या भरती वर्षात रिक्त असलेली ५२९७ पदे व २०२० या भरती वर्षात सेवानिवृत्ती, पदोन्नती, राजीनामा मुळे रिक्त होणारी पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, सशस्त्र पोलीस शिपाई या संवर्गातील एकूण सहा ६७२६  पदे त्याचप्रमाणे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयासाठी निर्माण करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यातील नवनिर्मित ९७५ पदांपैकी पोलीस शिपाई संवर्गातील ५०० हून अधिक अशी एकूण १२५३८ पदे भरण्यात येणार आहेत,अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली.

२०१९ मध्ये अर्ज केलेल्यांना दिलासा

     २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरती साठी ज्यांनी महा आय.टी. पोर्टल मार्फत अर्ज केलेले आहेत. त्या अर्जाबाबतही योग्य ती कार्यवाही केली जाईल.
    पोलीस शिपाई पदाची भरती प्रक्रिया लेखी परीक्षा, शारीरिक चाचणी, कागदपत्रांची पडताळणी, अशा विविध टप्प्यावर पार पडत असल्याने ही प्रक्रिया दीर्घकाळ सुरू राहते. त्यामुळे एकाच भरती प्रक्रियेत जास्तीत जास्त पदे भरण्याबाबत विभाग विचार करत आहे, असेही श्री.देशमुख यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.