Header Ads

राज्यात आजपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’

राज्यात आजपासून ‘कृषी संजीवनी सप्ताह’

या सप्ताहांतर्गत अधिकाऱ्यांनी कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याचे निर्देश 

जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रम करावेत 

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाणार कृषीमंत्री दादाजी भुसे

मुंबई, दि. ०१  - राज्यात आजपासून कृषि दिनानिमित्त ‘कृषी संजीवनी सप्ताह’ साजरा करण्यात येत आहे. कृषी मंत्री दादाजी भुसे कृषी सप्ताहाची सुरुवात त्र्यंबकेश्वर तालुक्यातील साप्ते आणि कोणे या गावातील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन करणार आहेत. याचबरोबर कृषी अधिकारी, कर्मचारी, कृषि विद्यापीठ व कृषि विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पीक उत्पादनवाढीसाठी नवनवीन तंत्रज्ञानाविषयी मार्गदर्शन करतील.

पिकाची उत्पादकता, गुणवत्ता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ या त्रिसुत्रीचा अवलंब करीत आज पासून ते 7 जुलै दरम्यान हा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. 

     राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात केलेली भरीव कामगिरी लक्षात घेऊन त्यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी  दि. 1 जुलै रोजी कृषिदिन साजरा केला जातो. यंदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कृषी संजीवनी सप्ताह साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

    कृषी तंत्रज्ञानातील छोटीशी सुधारणा देखील पीक उत्पादन वाढीवर मोठा परिणाम करू शकते त्यासाठी कृषि विभागातील अधिकारी – कर्मचारी, शास्त्रज्ञ आणि कृषि विस्तार यंत्रणेने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्याशी संवाद साधत कृषि विद्यापीठे, केंद्रीय संशोधन संस्था यांनी संशोधित केलेल्या अद्ययावत कृषि तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावे. त्यांना मार्गदर्शन करावे, असे निर्देश कृषिमंत्री श्री.भुसे यांनी दिले आहेत. 

     या सप्ताहांतर्गत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, कृषि विकास अधिकारी व प्रकल्प संचालक (आत्मा) यांनी दररोज किमान एका गावातील तर उपविभागीय कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी यांनी दररोज किमान दोन गावांतील कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करायचे आहे, असे सचिव एकनाथ डवले यांनी सांगितले.

     या सप्ताहामध्ये गावात बैठक आयोजित करतानाच शेतकऱ्यांनी राबविलेल्या कृषिविषयक नाविन्यपूर्ण उपक्रमांना देखील भेटी देण्याच्या सूचना दिल्या आहेत. एम किसान पोर्टलवर शेतकऱ्यांची नोंदणी मोहिम हाती घ्यावी. पुरस्कारप्राप्त शेतकरी, प्रयोगशील शेतकरी तसेच उल्लेखनीय काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करून त्यांचे तालुकास्तरीय कार्यक्रमात व्याख्यान आयोजित करावे, कृषि विषयक योजना, पतपुरवठा याबाबत शेतकऱ्यांमध्ये जाणिवजागृती मोहिम हाती घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.