Header Ads

लवकर निदान, उपचाराने ‘कोरोना’वर मात शक्य - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

लवकर निदान, उपचाराने ‘कोरोना’वर मात शक्य - जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक

‘कोरोना’मुक्त होण्याचे प्रमाण अधिक 
बरे होण्यासाठी औषधोपचारासह मानसिक आधाराची गरज
लक्षणे असलेल्या व्यक्तींना तपासणीसाठी प्रोत्साहित करा
‘कोविड’मुक्त झालेल्या व्यक्तींपासून कोणताही धोका नाही

        वाशिम, दि. ११ (जिमाका) : कोरोना विषाणू संसर्गापासून होणारा कोविड-१९ हा इतर संसर्गजन्य आजारांप्रमाणेच एक आजार आहे. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यूच होणार, हा गैरसमज आहे. लवकर निदान व उपचाराने कोरोना संसर्गावर मात करता येते. ज्या प्रमाणे इतर संसर्गजन्य आजार झालेली व्यक्ती बरी झाल्यानंतर त्याच्यापासून इतरांना  संसर्ग होत नाही, त्याचप्रमाणे कोविड-१९ या आजारातून मुक्त झालेल्या व्यक्तीपासून सुद्धा इतरांना कोणताही संसर्ग होत नाही. त्यामुळे अशा ‘कोविड’मुक्त व्यक्तींपासून दुरावा न ठेवता, त्यांना मानसिक आधार देण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.
      कोविड-१९ ची लक्षणे सुद्धा इतर आजारांप्रमाणेच आहेत. कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीमध्ये ताप, सर्दी, कोरडा खोकला, घसा दुखणे, जिभेची चव जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी प्रमुख लक्षणे आढळतात. लवकर निदान झाल्यास, योग्य औषधोपचार मिळाल्यास या आजारातून बाधित व्यक्ती बरी होते. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने, स्वतःहून नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये येवून आपली तपासणी करून घ्यावी, अथवा जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या व्हॉटस्अप हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, एखादी व्यक्ती कोरोना बाधित आढळल्यास त्या व्यक्तीकडे, तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो, असा अनुभव असल्याने कोरोना संसर्गाची लक्षणे असूनही काही व्यक्ती तपासणीसाठी पुढे येत नाहीत.
परिणामी, त्यांची तपासणी, संसर्गाचे निदान आणि औषधोपचार वेळेवर होवू शकत नाहीत.दरम्यानच्या काळात इतर व्यक्तींनाही त्यांच्यापासून संसर्ग होतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला, कुटुंबात अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करणे, त्याला मानसिक आधार देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या व्यक्तींलाही वेळेत उपचार मिळतील व तिच्यापासून इतरांना होणारा संसर्गही मर्यादित राहील, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले.
        कोरोना विषाणू संसर्ग झालेल्या व्यक्तीला लवकरत लवकर बरे होण्यासाठी औषधोपचारासोबतच मानसिक आधाराची सुद्धा गरज असते. कोरोना संसर्ग झाला म्हणजे मृत्यू होतो, असे नाही, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.  या संसर्गाचे लवकर निदान होवून उपचार घेतल्यानंतर आज अनेकजण या आजारावर मात करून परतले आहेत. ते सर्वजण कोरोनामुक्त जीवन जगत आहेत, समाजात वावरत आहेत. तरीही लोकांच्या मनामध्ये कोरोना संसर्गाविषयीचा गैरसमज कायम आहे. कोरोनामुक्त झालेल्या व्यक्तीकडून इतरांना कोणत्याही प्रकारचा संसर्ग होत नाही. त्यामुळे कोरोनावर मात करून परतल्यानंतर समाजाने त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहून त्यांना पुन्हा नव्याने आपल्या आयुष्याची सुरुवात करण्यासाठी मदत करावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

कोरोना संसर्गाची माहिती लपवू नका

        कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाल्यानंतर समाजाचा बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. कधी कधी तर जवळचे नातेवाईक सुद्धा कोरोना बाधित व्यक्तींना दूर लोटतात. त्यामुळे त्यांना मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात, तपासणीसाठी लवकर पुढे येत नाहीत. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच ह्या व्यक्ती रुग्णालयात येतात. परिणामी, या संसर्गाचे निदान होण्यास विलंब होतो, डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो. हे टाळण्यासाठी समाजातील प्रत्येक व्यक्तीने बाधितांकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला पाहिजे. कोरोना संसर्गाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तीने काहीतरी गुन्हा केला आहे, अशी वागणूक न देता त्याला तपासणीसाठी प्रोत्साहित करावे. तसेच तो कोरोनामुक्त होवून परतल्यानंतर सुध्दा आपुलकीची वागणूक देवून मानसिक आधार द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.