Header Ads

खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू : ३१ जुलैपर्यंत विमा हप्ता भरता येणार

खरीप हंगामासाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू

  • ३१ जुलैपर्यंत विमा हप्ता भरता येणार
  • कर्जदार, बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक योजना
  • सामुहिक सुविधा केंद्र, बँक शाखेत जमा करता येणार विमा हप्ता

     वाशिम, दि. ०१ (जिमाका) : जिल्ह्यात सन २०२०-२१ खरीप हंगामसाठी पंतप्रधान पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे. सदर योजनाकरिता पुढील तीन वर्षांसाठी रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडसोबत करार करण्यात आला आहे. या योजनेमुळे जिल्ह्यातील सहा पिकांना विमा संरक्षण मिळणार असून नैसर्गिक आपत्ती, किड व रोगामुळे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना भरपाई देण्यात येणार आहे. कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी विमा योजना ऐच्छिक आहे. शेतकऱ्यांनी विमा प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
     सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद व खरीप ज्वारी पिकाचा विमा पीक योजनेत समावेश असून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेंतर्गत सर्व पिकांसाठी जोखीमस्तर ७० टक्के असा निश्चित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादीत ठेवण्यात आला आहे. अधिसुचित क्षेत्रातील अधिसुचित पिकांचे उंबरठा उत्पन्न हे मागील ७ वर्षांचे सरासरी उत्पन्न (नैसर्गिक आपत्ती जाहीर झालेली २ वर्ष वगळून) गुणीले त्या पिकाचा जोखिमस्तर विचारात घेवून निश्चित केले जाणार आहे.
     प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र व बँकेकडे विमा प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहे. प्रस्तावासोबत सातबारा, आधारकार्ड, पिक पाहणी झाली असल्यास पिकांची पेरणीबाबतचे स्वयंघोषणापत्र जोडणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांचे संबंधित बँकेत खाते असणे आवश्यक आहे. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालय, कृषि सहायक, कृषि पर्यवेक्षक, मंडळ कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अंतिम मुदतीची वाट न बघता पंतप्रधान पिक विमा योजनेचा लाभ घेण्यासाठी बँकेकडे प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

या नुकसानीलाही मिळणार भरपाई

     प्रधानमंत्री पीक विमा योजनेद्वारे शेतकऱ्यांना वैयक्तिक पातळीवर विमा संरक्षण लागू करण्यात आले आहे. पिकास दुष्काळ, पूर, भूस्खलन, चक्रीवादळ, अतिवृष्टी, कीड, रोगराई, पावसातील खंड, नैसर्गिक आग, वीज कोसळणे इत्यादीमुळे होणारे नुकसान हे विमा कंपनी व राज्य शासनाचे अधिकारी यांच्या संयुक्त पाहणीनुसार विमा कंपनीमार्फत वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून नुकसानीचे प्रमाण व द्यावयाची नुकसान भरपाई ठरविली जाईल. जर अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे अपेक्षित उत्पन्न हे त्या पिकांच्या उंबरठा उत्पन्नाच्या ५० टक्केपेक्षा कमी असेल तर सर्व अधिसूचित विमा क्षेत्र हे त्या मदतीसाठी पात्र राहील.

नुकसान झाल्यास ७२ तासात माहिती देणे आवश्यक

     योजनेत सहभागी शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसान झाल्यास सदर शेतकऱ्यांनी ज्या वित्तीय संस्थेमार्फत योजनेत सहभाग घेतला आहे, त्या संबंधित वित्तीय संस्था, विमा कंपनी, कृषी किंवा महसूल विभागास किंवा टोल फ्री नंबरद्वारे कोणत्याही परिस्थितीत नुकसान झाल्यापासून ७२ तासांच्या आत माहिती देणे आवश्यक आहे. तसेच शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज व पिकांची नोंद असलेला सातबारा उतारा, विमा हप्ता भरल्याचा पुरावा यासह आवश्यक पत्रे सादर करणे आवश्यक आहे. शेतकरी परिपूर्ण माहितीसह विहित नमुन्यातील अर्ज सादर करू न शकल्यास उपलब्ध माहितीच्या आधारे अर्ज सादर करता येईल. मात्र अर्जातील उर्वरित माहिती ७ दिवसाच्या आत विमा कंपनीला सादर करणे आवश्यक आहे. पीक नुकसानीचा पुरावा म्हणून संगणक प्रणालीद्वारे घेतलेली छायाचित्रे देता येतील. सदर योजना ऐच्छिक असून कर्जदार शेतकऱ्यांना योजनेत सहभागी व्हायचे नसल्यास विहित प्रपत्रात माहिती भरून पीक कर्ज घेतलेल्या बँक शाखेस कळविणे आवश्यक आहे.

गतवर्षी १४७ कोटी रुपयांची भरपाई

     गतवर्षी २०१९-२० मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेत २ लक्ष ९६ हजार शेतकरी सहभागी झाले होते. यापैकी १ लक्ष ४८ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन पिकासाठी १४५ कोटी रुपये, ८ हजार १४२ शेतकऱ्यांना तूर व कापूस पिकासाठी २ कोटी ६ लक्ष रुपये तसेच उडीद व मुग पिकासाठी १० हजार शेतकऱ्यांना ७९ लक्ष रुपये नुकसान भरपाई देण्यात आली आहे. त्यामुळे यावर्षीही जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषि विभागाने केले आहे.

पीकनिहाय पीक विमा योजनेच हप्ता खालीलप्रमाणे आहे

पिकाचे नाव
विमा संरक्षित
रक्कम रु.(प्रति हेक्टर)
शेतकऱ्यांनी भरावयाचा
पीक विमा हप्ता
सोयाबीन 
४५,०००/-
९००/-
कापूस
४३,०००/-
२१५०/-
तूर
३१,५००/-
६३०/-
मुग व उडीद
१९,०००/-
३८०/-
खरीप ज्वारी
२५,०००/-
५००/-

No comments

Powered by Blogger.