Header Ads

PM Shetkari Sanman Yojana - लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती - २३ जुलै ते ५ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहीम

प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती

२३ जुलै ते ५ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहीम

राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना मिळाला लाभ-कृषिमंत्री दादाजी भुसे

     मुंबई, दि.२४ - राज्यातील ज्या शेतकऱ्यांना अद्याप प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचा लाभ मिळाला नाही त्यासाठी  दि. ५ ऑगस्टपर्यंत विशेष मोहीम राबवून लाभार्थ्यांच्या माहितीतील त्रुटी दुरुस्ती करावी व नवीन लाभार्थ्यांची नोंदणी करावी, असे आवाहन कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. दरम्यान, या योजनेंतर्गत राज्यातील ९१ लाख १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून त्यांच्या खात्यात पाच हप्त्यात  ६ हजार ९४९ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.

     राज्यातील जे शेतकरी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेपासून वंचित आहेत त्याचा आढावा घेण्यासाठी कृषिमंत्र्यांनी आढावा बैठक घेतली. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, कृषी सहसंचालक यावेळी उपस्थित होते.

२३ जुलै ते ५ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहीम

     राज्यात १ कोटी ५२ लाख शेतकरी आहेत. या योजनेंतर्गत आतापर्यंत १ कोटी ४ लाख शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. मात्र काही लाभार्थ्यांच्या माहितीमध्ये त्रुटी आढळून आल्याने त्यांना योजनेचा लाभ मिळत नाही. त्रुटी असलेल्या माहितीमध्ये जिल्हास्तरावर दुरुस्ती करण्यात यावी यासाठी २३ जुलै ते ५ ऑगस्ट या पंधरवड्यात विशेष मोहीम राबवून माहितीतील त्रुटी दूर करून नवीन लाभार्थ्यांची नोंदणी केली जाणार आहे.

     या कालावधीत सर्व जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी, तालुका कृषि अधिकारी व कृषि सहाय्यक यांनी महसूल यंत्रणेशी समन्वय साधून योजनेंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या अर्जातील त्रूटी दूर कराव्यात व शेतकऱ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश कृषिमंत्री श्री. भुसे यांनी दिले. कोरोना संकटाच्या काळात १ एप्रिल नंतर योजनेतील पात्र लाभार्थ्यांना २४४१ कोटी रक्कम थेट जमा करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.

No comments

Powered by Blogger.