Header Ads

संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू फळपिकाला विमा संरक्षण

संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू फळपिकाला विमा संरक्षण

संत्रा, लिंबू फळपिकाकरीता २० जून २०२० पर्यंत, तसेच डाळिंब फळपिकासाठी १४ जुलै २०२० पर्यंत विमा हप्ता भरता येणार 

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तोटावार यांची माहिती 

     वाशिम, दि. १० (जिमाका) : जिल्ह्यात सन २०२०-२१, २०२१-२२ व २०२२-२३ या तीन वर्षांसाठी मृग व आंबिया बहारातील संत्रा, डाळिंब, आंबा व लिंबू  या फळपिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळपिक विमा योजना राबविण्यासाठी मान्यता मिळाली आहे. मृग बहारातील संत्रा, लिंबू फळपिकाकरीता २० जून २०२० पर्यंत, तसेच डाळिंब फळपिकासाठी १४ जुलै २०२० पर्यंत विमा हप्ता भरता येणार आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार यांनी केले आहे.
     मृग बहारातील संत्रा फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील वाशिम, अनसिंग, केकतउमरा, पार्डीआसरा, राजगाव, रिसोड तालुक्यातील  रिसोड, केनवड, भरजहांगीर, वाकद व  रिठद, मालेगाव तालुक्यातील मालेगाव, मुंगळा, करंजी, किन्हीराजा, शिरपूर, चांडस व मेडशी, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, पोटी, कवठळ, धानोरा, शेलूबाजार,  पार्डीताड, मानोरा तालुक्यातील मानोरा, गिरोली, उमरी बु., शेंदूरजना व कुपटा तसेच कारंजा तालुक्यातील कारंजा, उंबर्डा बाजार, कामरगाव, धनज बु. पोहा, हिवरा लाहे, येवता व खेर्डा बु. या महसूल मंडळांचा समावेश विमा योजनेत करण्यात आला आहे. संत्रा पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी ८० हजार रुपये असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ४ हजार रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. मृग बहाराकरिता संत्रा पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत २० जून  २०२० पर्यंत आहे.
     डाळींब या फळपिकासाठी वाशिम तालुक्यातील पार्डीआसरा, पार्डी टकमोर, नागठाणा व राजगाव, मालेगाव तालुक्यातील मुंगळा, मंगरूळपीर तालुक्यातील मंगरूळपीर, कवठळ, आसेगाव, धानोरा, शेलूबाजार व पार्डीताड, मानोरा तालुक्यातील उमरी बु. या महसूल मंडळांचा समावेश आहे. डाळिंब या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रति हेक्टरी १ लक्ष ३० हजार रुपये असून शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ६ हजार ५०० रुपये विमा हप्ता भरावा लागणार आहे. डाळिंब पिकासाठी विमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत १४ जुलै २०२० पर्यंत आहे.
     आंबा या फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील केकतउमरा व राजगाव, मानोरा तालुक्यातील मानोरा या महसूल मंडळांचा समवेश विमा योजनेत करण्यात आला आहे. आंबा पिकासाठी प्रति हेक्टर १ लक्ष ४० हजार रुपये विमा संरक्षण मिळणार असून याकरिता प्रति हेक्टरी ७ हजार रुपये विमा हप्ता शेतकऱ्यांनी भरावयाचा आहे. आंबिया बहरमध्ये आंबा पिकासाठी योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३० नोव्हेंबर २०२० पर्यंत आहे.
     लिंबू या फळपिकाकरीता वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर या महसूल मंडळाचा समावेश आहे. लिंबू फळपिकासाठी प्रतिहेक्टर ७० हजार रुपयांचे विमा संरक्षण मिळणार असून याकरिता शेतकऱ्यांना प्रति हेक्टर ३ हजार ५०० रुपये विमा हप्ता भरावा लागेल. या पिकासाठी विमा हप्ता भरण्याची अंतिम मुदत २० जून २०२० पर्यंत आहे.तरी जिल्ह्यातील कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घावा. अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अंतिम मुदतीची वाट न पाहता लवकरात लवकर या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. तोटावार यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.