Header Ads

प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्या

प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना तातडीने पीक कर्ज द्या

पीक कर्ज वाटपामध्ये दिरंगाई करू नका 

 अनावश्यक कागदपत्रांची मागणी करू नका

जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आदेश 


     वाशिम, दि. ०९ (जिमाका) : खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वेळेवर पीक कर्ज उपलब्ध होणे आवश्यक आहे. त्यामुळे बँकेत येणाऱ्या प्रत्येक पात्र शेतकऱ्याला तातडीने पीक कर्ज उपलब्ध करून द्या. पीक कर्ज वाटपात दिरंगाई करू नका, असे निर्देश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व बँकांना दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात आज, ९ जून रोजी झालेल्या बँक अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
     यावेळी जिल्हा उपनिबंधक श्री. गडेकर, ‘नाबार्ड’चे जिल्हा प्रबंधक विजय खंडरे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर यांच्यासह बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
     जिल्हाधिकारी श्री. मोडक म्हणाले, शेतकऱ्यांना सध्या कर्जाची खरी गरज आहे. त्यामुळे बँकांनी पीक कर्ज वाटपाची कार्यवाही अधिक गतीने करून प्रत्येक पात्र शेतकऱ्याला पीक कर्जाचा लाभ द्यावा. महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत पात्र ठरलेल्या व कर्जमुक्तीचा लाभ भेटलेल्या सर्व शेतकऱ्यांनी बँकांनी कर्ज उपलब्ध करून द्यावे. पीक कर्ज मागणीसाठी येणाऱ्या शेतकऱ्यांकडून अनावश्यक कागदपत्रांची मागणी करून त्यांची अडवणूक करू नका, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी यावेळी दिल्या.
     जिल्ह्यात आतापर्यंत ३४ हजार ३०६ शेतकऱ्यांना २८४ कोटी ६६ लक्ष रुपये पीक कर्ज वाटप झाले आहे. पीक कर्ज वाटपाचा बँकनिहाय नियमित आढावा सध्या सुरु आहेच. मात्र, यापुढे बँकांनी पीक कर्ज वितरणाची गती न वाढविल्यास बँकनिहाय सर्व शाखा व्यवस्थापकांची स्वतंत्र आढावा बैठक घेतली जाईल, असेही जिल्हाधिकारी श्री. मोडक यावेळी म्हणाले

No comments

Powered by Blogger.