Header Ads

संचारबंदी विषयक आदेशांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ : जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांचे आदेश

संचारबंदी विषयक आदेशांना ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ

जिल्हाधिकारी  हृषीकेश मोडक यांचे आदेश 

      वाशिम, दि. ३० (जिमाका) : कोरोना विषाणूच्या संसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये जिल्ह्यात लागू करण्यात आलेली संचारबंदी ३१ जुलै २०२० पर्यंत कायम ठेवण्यात येणार असून त्याअनुषंगाने निर्गमित केलेल्या इतर आदेशांना जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी ३१ जुलैपर्यंत मुदतवाढ दिली आहे.

     कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग अधिनियम १८९७ लागू करण्यात आला आहे. वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या प्रसाराला तत्काळ प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून जिल्ह्यात फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम २ अन्वये संचारबंदी लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी दिले होते. हे आदेश ३१ जुलै पर्यंत लागू राहणार आहेत.

     जिल्हाधिकारी कार्यालयात नागरिकांची गर्दी होवू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून अत्यंत आवश्यकता असेल तरच नागरिकांनी कार्यालयात यावे. अन्यथा शासकीय कार्यालयात येणे टाळावे, तसेच सामुहिक निवेदने, अर्ज, तक्रारी, फिर्याद कार्यालयास प्रत्यक्ष येवून सादर करून नये, असे आदेश देण्यात आले होते. हे आदेश आता ३१ जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहेत. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करणे, बाहेरील जिल्ह्यातील व्यक्तींना जिल्ह्यात प्रवेशास मनाई व अत्यावश्यक कारण वगळता जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्याबाबतचा २३ मार्च २०२० रोजीचा आदेश सुद्धा ३१ जुलै २०२० पर्यंत लागू राहणार आहे.

     या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने भारतीय दंड संहिता (१८६० चा ४५) कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी श्री. मोडक यांनी ३० जून रोजी  निर्गमित केलेल्या आदेशात म्हटले आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.