Header Ads

सोमवार दि.२५ रोजी भूमिपुत्रचे हळद आंदोलन


सोमवार दि.२५ रोजी भूमिपुत्रचे हळद आंदोलन 

विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात शेतकरी करणार आंदोलन 


     वाशीम (जनता परिषद) दि. २३ -  हळदीला दहा हजार रुपये हमीभाव मिळावा या प्रमुख मागणीसह हळद उत्पादकांच्या समस्या सरकारने सोडवाव्या यासाठी भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या वतीने संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांच्या नेतृत्वात सोमवारी ता. २५ मे रोजी  हळद अंगाला लावून आंदोलन केले जाणार आहे. 
            हळद हे महाराष्ट्रातील प्रमुख मसाले पीक आहे व आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असल्याने शेतकरी मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करतात. मात्र या वर्षी कोरोनाच्या संकटाने हळदीला चार ते पाच हजार इतका अत्यल्प भाव मिळत असल्याने हळद उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. हळद हे वर्षभराचे पीक असून उत्पादन खर्च मोठा आहे. सध्याचे भाव पाहता उत्पादन खर्चही निघणे शक्य नाही.  त्यामुळे हळदीला किमान दहा हजार रुपये हमीभाव शासनाने द्यावा या प्रमुख मागणी सह हळदीला पिक विमा संरक्षण देण्यात यावं, शासनाने हळदीची खरेदी करावी, नॆसर्गिक आपत्तीत हळद पिकाला मदत देण्यात यावी, शासनाच्या विविध योजने अंतर्गत यांत्रिकीकरण व सिंचनासाठी लागणारे साहित्य हळद उत्पादक शेतकऱ्यांना प्राधान्याने देण्यात यावे, पीक कर्ज वाटपात एकरी पन्नास हजार रुपये पीक कर्ज हळद उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात यावे.  यासाठी शेतकरी अंगाला हळद लावून, मागणीचे फलक हातात धरून फोटो काढतील व शासनाला पाठवतील. 
             वरील मागण्यांच्या अनुषंगाने राज्याचे मुख्यमंत्री, कृषी मंत्री, कृषी सचिव यांच्याशी भूमिपुत्राचे संस्थापक अध्यक्ष विष्णुपंत भुतेकर यांनी पत्रव्यवहार केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष रामेश्वर अवचार यांनी दिली आहे. या आंदोलनात जास्तीत जास्त हळद उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा कार्याध्यक्ष उत्तमराव आरु यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.