Header Ads

जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला आज घरी सोडण्यात आले


जिल्ह्यातील कोरोनामुक्त झालेल्या रुग्णाला आज घरी सोडण्यात आले

‘साहब, आपने बहोत मेहनत किया...!’

 कोरोना ‘निगेटिव्ह’ झालेल्या त्या व्यक्तीने मानले आभार


     वाशिम, दि. २५ (जिमाका) : जिल्ह्यातील एकमेव कोरोना बाधित व्यक्तीचे २० व २१ दिवसानंतरचे अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्यानंतर या व्यक्तीला आज, २५ एप्रिल रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. ‘साहब, आपने बहोत मेहनत किया...’ असे म्हणत त्याने जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेचे आभार मानेल. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांच्या उपस्थितीत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप दिला.
     जिल्ह्याबाहेर प्रवास करून आलेल्या या व्यक्तीला कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याची बाब ३ एप्रिल रोजी आलेल्या त्याच्या घशातील स्त्रावाच्या अहवालावरून समोर आली. त्यानंतर कोरोना बाधित व्यक्तींवर उपचार करण्यासाठी नेमलेल्या आरोग्य पथकाने त्याच्यावर शासनाच्या नियमावलीनुसार उपचार सुरु केले. सातत्याने उपचार करून १४ व १५ व्या दिवशी त्याच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. मात्र, यामधील एक अहवाल पुन्हा ‘पॉझिटिव्ह’ आला. त्यामुळे या व्यक्तीचा रुग्णालयातील मुक्काम पाच दिवसांनी वाढला.
     पुढील पाच दिवस उपचार केल्यानंतर २० व २१ व्या दिवशी पुन्हा घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले. यावेळी मात्र, त्याच्यावर उपचार करणाऱ्या आरोग्य पथकाच्या प्रयत्नांना यश आले. या व्यक्तीचे दोन्ही अहवाल ‘निगेटिव्ह’ आल्याचे २४ एप्रिल रोजी स्पष्ट झाले. त्यामुळे त्याला रुग्णालयातून सोडण्याचा मार्ग मोकळा झाला. आज, २५ एप्रिल रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांच्या उपस्थित या व्यक्तीला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी या व्यक्तीला टाळ्या वाजवून निरोप दिला. यावेळी भावूक होत सदर व्यक्तीने त्याच्यावर उपचार करणाऱ्या वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे आभार मानले. तसेच जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणेला सुद्धा धन्यवाद दिले.

No comments

Powered by Blogger.