Header Ads

ग्रामिण भागात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे


ग्रामिण भागात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी सर्व गट विकास अधिकाऱ्यांनी दक्ष रहावे !  

जि.प. अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे निर्देश   


     वाशिम, दि.18 - कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने  दि. 17 रोजी जिल्हा परिषदेत विविध विभागाचा आढावा घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. श्याम गाभणे यांनी प्रशासनाच्या वतीने ग्रामीण भागात राबविण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत माहिती घेतली. तसेच ग्रामीण भागातील परिस्थिती नियंत्रणात राहुन कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गटविकास अधिकारी यांना आवश्यक ते निर्देश देण्यात आले.
बैठकीच्या सुरुवातीला ग्रामपंचायत निहाय निधी वाटप वाटप बाबत आढावा घेण्यात आला. 20 एप्रिल नंतर बाहेरून आपल्या गावात परतणाऱ्या लोकांची माहिती तात्काळ जिल्हा स्तरावर सादर करण्याबाबत निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिले. यामुळे बाहेरून लोकांची तपासणी करणे व त्यांना आवश्यक त्या सूचना देणे शक्य होईल. कामानिमित्त बाहेर गेलेल्या आणि आता गावाकडे परतणाऱ्या लोकांची काही दिवस शाळेमध्ये राहण्याची व्यवस्था करावी. दरम्यान शाळेत प्रसाधनगृह, लाईट व पाण्याची सुविधा तयार ठेवण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मीना यांनी संबंधितांना दिले.

बचत गटांना मास्क बनविण्याचे काम दयावे: दीपक कुमार मीना

      जिल्ह्यामध्ये अनेक चांगले बचत गट असून त्यांना मास्क बनवण्याचे काम दिल्यास गटांना आर्थिक हातभार लागेल आणि लोकांनाही किफायतशीर किमतीमध्ये मास्क उपलब्ध होतील. त्यामुळे तालुक्‍यातील बचत गटांना बनवण्याचे काम देण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी सर्व गटविकास अधिकार्‍यांना दिले.

     जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी ग्रामीण भागात असलेले दवाखाने, कर्मचारी, दवाखान्या मधील औषधाचा साठा याबाबत आढावा घेतला. सर्व ग्रामपंचायतीमध्ये पुढील दोन महिन्याचा पावडरचा साठा ठेवावा व पिण्याच्या पाण्यामध्ये नियमित वापर करावा अशा सूचनाही ठाकरे यांनी दिल्या.
    ज्या गावामध्ये दिव्यांग व्यक्ती आहेत त्यांना शासनामार्फत जीवनावश्यक वस्तू पुरवण्यात येत आहेत. याबाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. तसेच जिल्हा परिषद मार्फत 19 लाख रुपयाचा निधी दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तू करिता देण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष ठाकरे यांनी दिले. 

गावकऱ्यांच्या सुविधेसाठी जि. प. अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचे निर्देश:

1. वाशिम जिल्ह्यामध्ये सुमारे 28 हजार मजूर बाहेरून आले आहेत. यामध्ये आणखी भर पडणार आहे. या मजुरांना एमआरजीएस अंतर्गत काम देण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी यांना दिले. 
2. खरिपपूर्व खत आणि बी बियाणे याबाबत वरीष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करुन जिल्हया करीता आवश्यक मागणी व पुरवठा याबाबत आढावा घेण्यात आला.
3. पावसाळयात अनेक जनावरांवर खुरीची बिमारी येत असते, त्यामुळे पावसाळा सुरु होण्याआधीच पशु संवर्धन विभागाने लसीकरणाची मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले.
4. कृषी विभागाची बिरसा मुंडा आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वावलंबन योजना अंतर्गत जिल्हयातील पात्र लाभार्थ्यांना तात्काळ लाभ देण्याचे निर्देश ठाकरे यांनी दिले.
5. आता उन्हाळा सुरु झाला असुन अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार आहे. याबाबत तात्पुरती दुरुस्ती, विहिर अधिग्रहन, टँकर आदिंबाबत तात्काळ उपाययोजना करुन हा प्रश्न सोडविण्याचे निर्देश पाणी पुरवठा विभागाला दिले.
6.  शासकीय रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलांना प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या बेबी कीट बाबतही यावेळी आढावा घेण्यात आला. पात्र लाभार्थी कोणत्याही योजनेतुन सुटता कामा नये असे निर्देशही ठाकरे यांनी दिले.
     यावेळी स्वच्छता विभाग, घरकुल, पशुसंवर्धन या विभागांचाही आढावा घेण्यात आला. बैठकीला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी आर के तापी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुदाम ईस्कापे, शिक्षण अधिकारी अंबादास मानकर, कार्यकारी अभियंता निलेश राठोड आणि सर्व गटविकास अधिकारी यांची उपस्थिती होती.

       कोरोना आजाराच्या नियंत्रणा संदर्भात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन यावेळी करण्यात आले. सदर बैठकीला जास्त गर्दी न करता विभागवार आढावा घेण्यात आला तसेच प्रत्येकाने मास्क बांधून एकमेकांमध्ये  तीन फुटाच्या वर अंतर ठेवून फिजिकल डिस्टंसिंग पाळण्यात आले होते.

No comments

Powered by Blogger.