Header Ads

जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर ग्रामस्तरीय समिती ठेवणार ‘वॉच’


जिल्ह्याबाहेरून येणाऱ्या व्यक्तींवर

 ग्रामस्तरीय समिती ठेवणार ‘वॉच’

ग्रामस्तरीय अधिकाऱ्यांना परवानगी तपासणीचे अधिकार
 जिल्हाबंदी, संचारबंदी आदेशाची होणार कडक अंमलबजावणी
वाशिम, दि. १८ (जिमाका) : जिल्ह्यात कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाबंदी व संचारबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. जिल्हाबंदी तसेच ‘होम क्वारंटाईन’ आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार विना परवानगी जिल्ह्यात येणाऱ्या ५५ पेक्षा अधिक व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यापुढे परराज्यातून अथवा इतर जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्तींवर ग्रामस्तरीय समिती लक्ष ठेवणार असून अशा व्यक्ती आढळल्यास त्यांच्या परवानग्या तपासणे, रीतसर परवानगी घेवून आलेल्या व्यक्तींना ‘होम क्वारंटाईन’ची नोटीस देण्याची जबाबदारी या समितीच्या शासकीय सदस्यांवर सोपविण्यात आली आहे. याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी निर्गमित केले आहेत.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाने निर्गमित केलेल्या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी सहाय्य करण्यासाठी प्रत्येक गाव पातळीवर स्थानिक लोकप्रतिनिधी व ग्रामस्तरीय अधिकारी यांच्या समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे सदस्य असलेल्या पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक व कृषि सहाय्यक यांना आता मुंबई, पुणे, नागपूरसारख्या महानगरातून तसेच इतर जिल्हे, परराज्यातून आलेल्या व्यक्तींच्या परवानगीची तपासणी करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. ज्या व्यक्तींकडे पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षकांची रीतसर परवानगी आहे, अशा व्यक्तींना ग्रामस्तरीय समिती लेखी नोटीस देवून ‘होम क्वारंटाईन’ होण्यास कळविणार आहे.
विना परवानगी जिल्ह्यात, गावात आलेल्या व्यक्तींच्या प्रकरणात ग्रामस्तरीय समिती पंचनामा करून पंचनाम्याची प्रत ग्रामपंचायतीमध्ये जमा करेल. पंचनामा करून घेण्याची जबाबदारी तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व पोलीस पाटील यांची राहणार आहे. विना परवानगी आलेल्या व्यक्तींना शक्यतो गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये ठेवण्यात येईल. यासाठी पांघरून, पिण्याचे व वापरण्याचे पाणी, भोजनाची व्यवस्था करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. शाळेत वीज, स्वच्छता, वापरण्याचे पाणी याबाबतची व्यवस्था संबंधित शाळेच्या मुख्याध्यापकांनी करावी. संबंधित व्यक्तीचा पूर्वइतिहास, पूर्ववागणूक पाहता ‘होम क्वारंटाईन’चा निर्णय ग्रामस्तरीय समितीने घ्यावा, असे आदेश देण्यात आले आहेत. तसेच या आदेशाच्या अंमलबजावणीत कसूर केल्यास तलाठी, ग्रामसेवक, कृषि सहाय्यक व पोलीस पाटील यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.

‘होम क्वारंटाईन’च्या सूचना न पाळल्यास दाखल होणार गुन्हा
‘होम क्वारंटाईन’ अथवा जिल्हा परिषद शाळेत राहण्याची व्यवस्था केलेली व्यक्ती गावात इतरत्र फिरताना दिसून आल्यास तसा पंचनामा करून संबंधितावर भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात यावा. त्याला तत्काळ जिल्हा मुख्यालयी संस्थात्मक विलगीकरण कक्षात पाठविण्यात यावे. कुटुंबियांनी व गावकऱ्यांनी महानगरातून, परराज्यातून आलेल्या व्यक्तींच्या किमान १४ दिवस संपर्कात येवू नये, असे आवाजान जिल्हा प्रशासनाने केले आहे. तसेच अशा व्यक्तींची आरोग्य तपासणी नजीकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करून घेण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. सदर व्यक्तीने यामध्ये कसूर केल्यास त्यांची नावे समितीने तालुका दंडाधिकारी यांना ई-मेलद्वार कळवावीत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

No comments

Powered by Blogger.