Header Ads

कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश


कामगार, कर्मचाऱ्यांना संपूर्ण वेतन, भत्ते देण्याचे आदेश


वाशिम, दि. ०३ (जनता परिषद, जिमाका द्वारा साभार) : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे उद्योग, व्यवसायातील तसेच अन्य दुकाने व इतर आस्थापना बंद आहेत. या आस्थापनांच्या कर्मचारी, कामगारांना बंद काळातील संपूर्ण वेतन व भत्ते देण्याचे आदेश राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणने दिले आहेत.

सर्व खासगी आस्थापना, कारखाने, कंपन्या, दुकाने (अत्यावश्यक सेवा आस्थापना वगळून) इत्यादी आस्थापनांचे जे कंत्राटी, बाह्यस्त्रोताद्वारे उपलब्ध करून घेण्यात आलेले कर्मचारी व कामगार, तात्पुरत्या कालावधीसाठीचे कर्मचारी व कामगार, रोजंदारीवरील कामगार कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांमुळे घरी अथवा स्थानबद्ध आहेत, अशा सर्व कामगार व कर्मचाऱ्यांना ते कर्तव्यावर होते, असे समजून त्यांना बंद काळातील संपूर्ण वेतन व भत्ते देण्याचे आदेश महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या राज्य कार्यकारणीचे अध्यक्ष तथा मुख्य सचिव यांनी ३१ मार्च २०२० दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व निमशासकीय, औद्योगिक, वाणिज्यिक, व्यापारी व दुकाने आस्थापांना हे आदेश लागू राहतील. त्यांनी शासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन होईल, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी गौ. र. नालींदे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. 

No comments

Powered by Blogger.