Header Ads

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड


Do Not Spit

सार्वजनिक ठिकाणी थुंकल्यास ५०० रुपये दंड;

गुटखा, तंबाखू विकणाऱ्यांवर कारवाईचे आदेश

# सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक
# ग्रामपंचायत स्तरावरील सुविधा केंद्र सुरु करण्यास परवानगी


वाशिम, दि. १८ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्या व्यक्तींवर ५०० रुपये दंड आकारण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. तसेच जिल्ह्यात गुटखा, तंबाखूच्या विक्रीवर बंदी असून या पदार्थांची विक्री करताना आढळणाऱ्या व्यक्तींवर कठोर कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशातील लॉकडाऊनचा कालावधी ३ मे २०२० पर्यंत वाढविण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातही संचारबंदी व जिल्हाबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामांच्या ठिकाणी, वाहतुकीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे बंधनकारक करण्यात आले आहे. कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, साबणाचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. शासकीय कार्यालयात जास्त संख्येच्या कर्मचारी, अधिकारी असलेल्या सभा रद्द करण्यात आल्या आहेत. शासनमान्य ग्रामपंचायत स्तरावरील कॉमन सर्व्हिस सेंटर (सुविधा केंद्र) सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच स्थावर मालमत्ता खरेदी-विक्री व्यवहार सुरु करून मुद्रांक शुल्क विषयक ऑनलाईन प्रणालीद्वारे नोंदणी पूर्ववत सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय दंड संहिता कलम १८८ व साथरोग अधिनियम १८९७ अन्वये कारवाई करण्यात येणार आहे.
सर्व शासकीय, निमशासकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी ‘आरोग्य सेतू’ मोबाईल अॅप डाऊनलोड करून त्याचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
*****

No comments

Powered by Blogger.