Header Ads

अन्नधान्य वितरणावर शिक्षक ठेवणार लक्ष

अन्नधान्य वितरणावर शिक्षक ठेवणार लक्ष 

अन्नधान्य वितरणाचा दैनंदिन अहवाल द्यावा लागणार 

रास्तभाव दुकानावर होणार शिक्षकांची नेमणूक; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश



     वाशिम, दि. १८ (जिमाका) : नोवेल कोरोना विषाणूच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. संचारबंदी कालावधीत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा योग्य दरात होणे आवश्यक आहे. अशा संवेदनशील परिस्थितीत रास्तभाव दुकानांमध्ये अन्नधान्याचे वितरण सुरळीत होण्यासाठी जिल्हा पुरवठा विभागामार्फत उपाययोजना करण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील प्रत्येक रास्तभाव दुकानावरील धान्य वितरणाचे संनियंत्रण करण्यासाठी शिक्षकाची नेमणूक करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने  घेतला आहे.
     सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत शिधापत्रिकाधारकांची ई-पॉस मशीनद्वारे बायोमेट्रिक पद्धतीने पडताळणी करून अन्नधान्य वितरण केले जाते. मात्र, कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी बायोमेट्रिक पडताळणी न करता रास्तभाव दुकानदाराने स्वतःचे आधार अधिप्रमाणित करून धान्य वाटपाची कार्यवाही करण्याची सुविधा लॉकडाऊन कालावधीमध्ये करण्यात आली आहे. या पद्धतीने अन्नधान्य वितरण होताना कोणताही गैरप्रकार होवू नये, यासाठी रास्तभाव दुकानदारांना निर्देश देण्यात आले आहेत. तरीही अन्नधान्य वितरणाबाबत काही तक्रारी प्राप्त झाल्याने रास्तभाव दुकानातील अन्नधान्य वितरणावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे अन्नधान्य वितरण अधिक गतीने व सुरळीत होण्यास मदत होणार आहे.
     संबंधित तहसिलदारांनी गट शिक्षणाधिकाऱ्यांशी संपर्क करून आपल्या तालुक्यातील प्रत्येक रास्तभाव दुकानावर किमान एक शिक्षक अथवा शिक्षण विभागातील कर्मचारी यांची नेमणूक धान्य वाटप कामकाजावर नियंत्रण ठेवण्यासाठी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. रास्तभाव दुकानावर नियुक्त शिक्षक, कर्मचारी यांनी शिधापत्रिकाधारकांना योजनानिहाय दिले जाणारे धान्य, आकाराला जाणारा दर, धान्याची पावती, धान्य वाटप करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी आखणी, मोफत धान्य वाटपाची कार्यवाही आदी बाबींवर नियंत्रण ठेवायचे आहे. तसेच दैनंदिन कामकाजाचा अहवाल संबंधित तालुक्याच्या पुरवठा शाखेस ई-मेल अथवा व्हाटसअप संदेशाद्वारे सादर करावयाचा आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र जाधव यांनी दिली आहे.

No comments

Powered by Blogger.