Header Ads

‘अधिक दक्ष राहू, जिल्हा ‘कोरोना’मुक्त ठेवू..!


‘अधिक दक्ष राहू, जिल्हा ‘कोरोना’मुक्त ठेवू..!’

 जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व सरपंचांना पत्र

-  ग्रामस्तरावर चेकपोस्ट लावा, बाहेरून येणाऱ्या लोकांची माहिती द्या

-  गावातील दिव्यांग, वृद्ध, निराधार व्यक्तींची काळजी घेण्याचे आवाहन


वाशिम, दि. २८ (जिमाका) : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत असलेल्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आपले सहकार्य मोठ्या प्रमाणात मिळत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळे जिल्ह्यात आज रोजी एकही कोरोना बाधित व्यक्ती नाही. येणाऱ्या दिवसांतही आपण अधिक दक्ष राहून काम करू व आपला जिल्हा ‘कोरोना’मुक्त ठेवू, अशा आशयाचे पत्र वाशिमचे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी जिल्ह्यातील सर्व सरपंचांना पाठविले आहे.
कोरोना विषाणूला रोखण्यासाठी सर्व सरपंच व ग्रामस्तरीय समिती करीत असलेल्या कामाचे कौतुक करून पुढील काळातही या लढ्यात त्यांनी असेच योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व सरपंचांना केले आहे. मुंबई, पुणे यासह इतर ठिकाणहून जिल्ह्यात आलेल्या व्यक्तीं संबंधित सूक्ष्म उपाययोजना करण्यासाठी ग्रामस्तरावर स्थापन केलेल्या समितीमध्ये सर्वजण स्वयंस्फूर्तीने काम करीत आहेत, याचा जिल्हा प्रशासनाला अभिमान आहे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.

गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कठोर भूमिका घ्यावी लागेल

येणाऱ्या काळातही आणखी दक्ष राहून बाहेर जिल्ह्यातून, मुंबई, पुणे सारख्या महानगरातून व परराज्यातून येणाऱ्या व्यक्तींवर विशेष लक्ष केंद्रित करून अशा व्यक्तींना आवश्यकतेनुसार जिल्हा परिषद शाळेमध्ये ठेवणे, त्यांना लेखी नोटीस बजाविणे, ‘होम क्वारंटाईन’ करून ठेवणे या बाबींची अंमलबजावणी वेळेवर होणे आवश्यक आहे. यासाठी आपणाला अडचणींचा सामना करावा लागत असेल यात शंका नाही. परंतु, आपल्या नेतृत्वात गावातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही वेळा कठोर भूमिका ही घ्यावी लागणार आहे. ज्या व्यक्ती ‘होम क्वारंटाईन’ किंवा जिल्हा परिषद शाळेमध्ये ‘क्वारंटाईन’ राहणार नाहीत, अशा व्यक्तींची नावे तातडीने संबंधित तहसीलदार व पोलीस विभागाला कळविणे आवश्यक आहे. ही कार्यवाही वेळेत न झाल्यास अथवा दुर्लक्षित राहिल्यास गावामध्ये संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सरपंचांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

अधिक दक्ष राहून काम करणे आवश्यक

वाशिम जिल्ह्याच्या आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित व्यक्तींची संख्या दोन अंकी झाली आहे. या विषाणूचा संसर्ग आपल्या जिल्ह्यात होवू नये, यासाठी अधिक दक्ष राहून ग्राम पातळीवर चेकपोस्ट लावणे, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करणे, उपद्रव करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करणे, प्रसंगी काही लोकांना संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) कक्षात पाठविणे अशी कारवाई आपल्या स्तरावरून ग्राम समितीमार्फत करावी. जेणेकरून आपले गाव व पर्यायाने आपला जिल्हा कोरोना विषाणूपासून मुक्त राहू शकेल. खोकला, ताप, श्वसनाचा त्रास असलेल्या व्यक्तींना नजीकच्या फिव्हर क्लिनिक येथे तातडीने पाठविणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

वृद्ध, निराधार, आजारी व्यक्तींची काळजी घ्या

गावातील वृद्ध, निराधार व्यक्तींवर विशेष लक्ष द्यावे. अन्नधान्य पुरवठा सुरळीत सुरु असल्याची खात्री करावी. याशिवाय इतर आजार असलेल्या व्यक्तींनाही वैद्यकीय सेवा मिळत आहेत किंवा कसे याचीही खात्री करण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्व सरपंचांना सूचित केले आहे. तसेच परजिल्ह्यातून, परराज्यातून आलेल्या व्यक्तींचा तपशील, तातडीच्या प्रकरणी आजारी व्यक्तींची माहिती ८३७९९२९४१५ या क्रमांकावर नोंदवावी अथवा व्हाटसअप मेसेजद्वारे कळवावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.