Header Ads

विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या ३५० व्यक्तींवर गुन्हे दाखल

विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश केलेल्या ३५० व्यक्तींवर गुन्हे दाखल

९५ वाहने केली जप्त

 ‘होम क्वारंटाईन’चे आदेशाचे उल्लंघन; ५ जणांवर कारवाई



वाशिम, दि. २८ (जिमाका) : जिल्ह्यात सध्या एकही कोरोना बाधित रुग्ण नाही. त्यामुळे यापुढे कोरोना विषाणूचा संसर्ग जिल्ह्यात होवू नये व जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच जिल्ह्याच्या सर्व सीमा सील करून विना परवानगी जिल्ह्यात येण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच विना परवानगी जिल्ह्यात प्रवेश करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. त्यानुसार आतापर्यंत ३५० व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच ९५ वाहने सुद्धा जप्त करण्यात आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

राज्यभरात सर्वत्र कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या व्यक्तींची संख्या वेगाने वाढत आहे. वाशिम जिल्ह्याच्या आजूबाजूंच्या जिल्ह्यातही कोरोना बाधित रुग्ण आढळत आहेत. या विषाणूचा संसर्ग जिल्ह्यातील नागरिकांना होवू नये, यासाठी जिल्हा प्रशासन उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात संचारबंदी व जिल्हाबंदी आदेशाची अतिशय कडक अंमलबजावणी करण्यात येत आहे. राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातील व्यक्तीला वाशिम जिल्ह्यात प्रवेश करावयाचा असल्यास, त्यांनी ते सध्या ज्या जिल्ह्यात आहेत, तेथील पोलीस उपायुक्त अथवा पोलीस अधीक्षक यांची रीतसर परवानगी आणणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच रीतसर परवानगी न घेता जिल्ह्यात प्रवेश केलेल्या व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यानुसार विना परवानगी जिल्ह्यात येणार्‍या व्यक्तींवर गुन्हे दाखल करून त्यांची वाहने जप्त केली जात आहेत.

‘होम क्वारंटाईन’ आदेशाचे उल्लंघन प्रकरणी ५ जणांवर कारवाई
मुंबई, पुणे व इतर महानगरे, बाहेर जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात यापूर्वी परतलेल्या नागरिकांच्या हातावर ‘होम क्वारंटाईन’चे शिक्के मारून त्यांना घरीच अलगीकरणात राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या व्यक्तींवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले होते. त्यानुसार ‘होम क्वारंटाईन’चे उल्लंघन करणार्‍या जिल्ह्यातील ५ व्यक्तींवर कारवाई करण्यात आली असून त्यांची रवानगी संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) कक्षात करण्यात आली आहे.

No comments

Powered by Blogger.