महानगरातून आलेल्या नागरिकांचे घरातच अलगीकरण करा
महानगरातून आलेल्या नागरिकांचे घरातच अलगीकरण करा
जिल्हाधिकाऱ्यांचे तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना आदेश
पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यावर जबाबदारी
वाशिम, दि. ३० : संचारबंदी, लॉकडाऊनमुळे मुंबई, पुणेसह इतर महानगरातून नागरिक, विद्यार्थी जिल्ह्यात परतले आहेत. या सर्व नागरिकांनी १५ दिवस कुटुंबातील तसेच गावातील इतर व्यक्तींच्या संपर्कात न येता घरातच वेगळे राहणे आवश्यक आहे. त्यामुळे अशा सर्व नागरिकांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत नोटीस देऊन त्यांचे घरातच अलगीकरण (होम क्वारंटाईन) करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी सर्व तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना दिले आहेत.
जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या असून जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी मुंबई, पुणे यासह विविध शहरात, जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले नागरिक, विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण नसला तरी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एखाद्या व्यक्तीपासून या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे. तरीही बाहेरील जिल्ह्यातून आलेले हे नागरिक ग्रामीण भागात, खेड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होत नसल्याचे सांगून गावामध्ये खुलेआम वावरत आहेत. त्यामुळे संबंधित गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनी महानगरातून, बाहेरील जिल्ह्यातून गावात परतलेल्या सर्व नागरिकांना गृह अलगीकरणाची नोटीस देऊन त्यांना १५ दिवस घरातच स्वतंत्र खोलीत, कुणाच्याही संपर्कात न येता राहण्यास सांगावे.
गृह अलगीकरणची नोटीस देवूनही त्याचे उल्लंघन करून असे लोक खुलेआम वावरत असतील, तर त्यांची सविस्तर नोंद घ्यावी. अशा व्यक्तींची नावे पोलीस पाटील अथवा ग्रामसेवक यांनी संबंधित पोलीस चौकीत गोपनीय पध्दतीने द्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत.
Post a Comment