Header Ads

गृह अलगीकारणाचे आदेश न पाळणाऱ्या व्यक्तींवर होणार पोलीस कारवाई

गृह अलगीकारणाचे आदेश न पाळणाऱ्या व्यक्तींवर होणार पोलीस कारवाई

0  महानगरातून परतलेल्या व्यक्तींना देणार नोटीस

0  पुढील १५ दिवस घरातच राहण्याचे आदेश


                वाशिम, दि. ३० : ‘कोरोना’ विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुंबई, पुणे यासह इतर महानगरातून परत आलेले नागरिक, विद्यार्थी यांनी पुढील १५ दिवस गृह अलगीकरणात (होम क्वारंटाईन) रहावे. कुटुंबातील व्यक्ती अथवा गावातील नागरिकांशी संपर्क टाळून घरातील स्वतंत्र खोलीत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात संबंधितांना पोलीस पाटील, ग्रामसेवक यांच्यामार्फत लेखी नोटीस बजावली जाणार आहे. तसेच या आदेशांचे उल्लंघन केल्यास संबंधित व्यक्तीवर पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

             जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग झालेला एकही पॉझिटिव्ह अथवा संशयित रुग्ण आढळलेला नाही. जिल्ह्यातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिल्ह्यात प्रवेशबंदी करण्यात आली आहे. मात्र, तत्पूर्वी मुंबई, पुणे यासह विविध शहरात, जिल्ह्यात कामानिमित्त गेलेले नागरिक, विद्यार्थी आपल्या गावी परतले आहेत. जिल्ह्यात अद्यापपर्यंत कोरोनाचा रुग्ण नसला तरी बाहेरील जिल्ह्यातून आलेल्या एखाद्या व्यक्तीपासून या विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी पुढील काही दिवस खबरदारी घेणे आवश्यक आहे.

               महानगरातून, बाहेरील जिल्ह्यातून परत आलेले नागरिक ग्रामीण भागात, खेड्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होत नसल्याचे सांगत गावामध्ये खुलेआम वावरत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे संबंधित गावचे पोलीस पाटील, ग्रामसेवक यांनी महानगरातून, बाहेरील जिल्ह्यातून गावात परतलेल्या सर्व नागरिकांना गृह अलगीकरणाची नोटीस देऊन त्यांना १५ दिवस घरातच स्वतंत्र खोलीत, कुणाच्याही संपर्कात न येता राहण्यास सांगण्याचे आदेश जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहे. गृह अलगीकरणची नोटीस देवूनही त्याचे उल्लंघन करून असे लोक खुलेआम वावरत असतील, तर त्यांची सविस्तर नोंद घ्यावी. अशा व्यक्तींची नावे पोलीस पाटील अथवा ग्रामसेवक यांनी संबंधित पोलीस चौकीत गोपनीय पध्दतीने द्यावीत, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी दिले आहेत. या नागरिकांवर तातडीने पोलीस कारवाई करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

No comments

Powered by Blogger.