Header Ads

जिल्ह्यातील महामार्गांच्या कामांवरील मजुरांची वैद्यकीय तपासणी करा

जिल्ह्यातील महामार्गांच्या कामांवरील 

मजुरांची वैद्यकीय तपासणी करा


·        जिल्हाधिकाऱ्यांचे सर्व कंत्राटदारांना आदेश
·        मास्क, सॅनिटायझर वापराबाबत अवगत करा
·        मजुरांचा नजीकच्या गावातील लोकांशी संपर्क टाळा

वाशिमदि. २३ : नोवेल विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यात प्रभावी उपाययोजना करण्यात येत असून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी गर्दी टाळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावरील कामांवरही याबाबत योग्य काळजी घेण्यात यावी. तसेच या कामांवर असलेले उपकंत्राटदार, मजूर, वाहनचालक, क्लीनर यासह इतर कामगारांची वैद्यकीय तपासणी करून घेण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष हृषीकेश मोडक यांनी संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत.


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात १३ मार्च २०२० पासून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ लागू करण्यात आला आहे. त्यानुसार जिल्ह्यात या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना सक्षम अधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. या उपाययोजनांचा एक भाग म्हणून साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ अन्वये नागरिकांची एकाच ठिकाणी होणारी गर्दी टाळण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी यापूर्वीच निर्गमित केले आहेत. राष्ट्रीय महामार्ग व समृद्धी महामार्गावर काम करणाऱ्या मजुरांचीही एकाच ठिकाणी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा. त्यांची वैद्यकीय तपासणी करावी तसेच त्यांना मास्कसॅनिटायझर वापर करण्याबाबत अवगत करावे. महामार्गावरील मजूर लगतच्या गावातील लोकांच्या संपर्कात येणार नाहीत, याची दक्षता घेण्यात यावी, असे आदेश जिल्हाधिकारी श्री. मोडक यांनी सर्व संबंधित कंत्राटदारांना दिले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ कलम ५१ तसेच भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला, असे समजण्यात येईल आणि पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.