Header Ads

वाशिम जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद करण्याचे आदेश

वाशिम जिल्ह्याच्या सीमा तत्काळ बंद करण्याचे आदेश


·        केवळ जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणारी वाहने सुरु राहणार

·        जिल्ह्याच्या प्रत्येक सीमेवर नाकाबंदी; वाहनांची तपासणी


वाशिमदि. २३ : राज्यात नोवेल कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे. या विषाणूचा संसर्ग झालेला एकही रुग्ण जिल्ह्यात नाही. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांचा कोरोना विषाणूच्या संसर्गापासून बचाव करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी हृषीकेश मोडक यांनी दिले आहेत. जिल्ह्याची रहिवासी नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला अत्यावश्यक कारणांशिवाय प्रवेश दिला जाणार नाही. तसेच जिल्ह्यातील नागरिकांनाही जिल्ह्याबाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. पुढील आदेशापर्यंत सीमा बंदी कायम राहणार आहे.

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यातील किराणा, अन्नधान्य, फळे व भाजीपाला, दुध, औषधे, दूरसंचार, विद्युत, पिण्याचे पाणी विक्री करणारी दुकाने, बँक व पेट्रोलपंप आदी जीवनावश्यक सेवा वगळता संपूर्ण वाशिम जिल्ह्यातील इतर सर्व दुकाने १०० टक्के बंद राहतील. जिल्ह्यातील सर्व धार्मिक स्थळे भाविकांसाठी बंद राहतील. आवश्यकता नसेल तर नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आदेश देण्यात आले आहेत.

बाहेरील जिल्ह्यातून येणाऱ्या व्यक्ती, प्रवाशांमुळे जिल्ह्यातील नागरिकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे २३ मार्च २०२० पासून वाशिम जिल्ह्याच्या सर्व सीमा तत्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी यांनी निर्गमित केले आहेत. त्यामुळे जीवनावश्यक वस्तूंची, पेट्रोलियम पदार्थ, दुध, भाजीपाला, औषधी, धान्य, वैद्यकीय उपकरणे इत्यादींची वाहतूक वगळता जिल्ह्यात येणारी व जिल्ह्यातून जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात आली आहे.

सर्व सीमांची नाकाबंदी करण्यात येणार आहे. पुढील आदेशापर्यंत जिल्ह्याच्या सीमा बंद राहणार आहेत.  या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० मधील कलम १८८ नुसार शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

No comments

Powered by Blogger.