Header Ads

मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांना सीईओ वाघमारे यांचा संदेश - Washim ZP ceo Vaibhav Waghmare addressed zp school principals and Anganwadi Sevika

मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांना सीईओ वाघमारे यांचा संदेश - Washim ZP ceo Vaibhav Waghmare addressed zp school principals and Anganwadi Sevika


शाळा आणि अंगणवाडीला बोलके करा 

 मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांना सीईओ वाघमारे यांचा संदेश

शैक्षणिक दर्जा सुधारण्याचे उद्दीष्ट

वाशिम (www.jantaparishad.com) दि. १७ - एक चित्र हे हजार शब्दाएवढे प्रभावी असतं त्यामुळे शब्दांपेक्षा चित्र पाहिलेले लक्षात राहतात. तसेच एखाद्या विषयाची वारंवार उजळणी (रिव्हिजन)केली तरी ते जास्तकाळ स्मरणात राहते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा आणि अंगणवाड्यांना चित्र आणि मजकुराच्या बोलके करा असा संदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे (Washim ZP ceo Vaibhav Waghmare) यांनी (दि.१६) दिला.

    जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकुण ७७५ शाळा आहेत. त्यावर कार्यरत मुख्याध्यापक (zp school principals) व केंद्रप्रमुखांची एकत्रित बैठक घेण्यासाठी एकही मोठे सभागृह वाशिमात उपलब्ध नसल्यामुळे आजपर्यंत संबंधितांची बैठकच झाली नव्हती. मात्र, विद्यमान सीईओ वाघमारे यांनी सभागृहाच्या भानगडीत न पडता थेट जिल्हा परिषदेच्या प्रांगणातच ७७५ मुख्याध्यापक, ७१ केंद्रप्रमुख, ६ गटशिक्षणाधिकारी आणि १४ शिक्षण विस्तार अधिकाऱ्यांना बसवून मॅरेथॉन बैठक घेतली. तसेच या बैठकीनंतर लगेचच 958 अंगणवाडी सेविका (Anganwadi Sevika), 17 पर्यवेक्षिका आणि 6 बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी जि. प. च्या सभागृहात संवाद साधला.

    वाघमारे यांनी यावेळी जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासंबंधी पाच महत्वाच्या मुद्यांवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता वाढविण्यासाठी पंचसुत्रीचे पालन करा. सर्व शाळा आणि अंगणवाडींच्या भिंती बोलक्या करा. शाळा-अंगणवाडींच्या पूर्ण भिंती, छत, स्वच्छतागृह, वॉल कंपाऊडसह सर्व रंगवा, केवळ रंगवु नका तर संदेश आणि चित्राच्या माध्यमातुन  विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण द्या.” पुढे बोलतांना सीईओ वाघमारे म्हणाले,  “येणाऱ्या जुन महिन्यापूर्वी प्रत्येक शाळेत २०० झाडांची बाग तयार करा. नविन सत्रापासुन दर २ महिन्याला विद्यार्थ्यांची मुलभूत चाचणी घेतल जाणार असुन यामाध्यमातुन मुलांच्या ६ क्षमता तपासल्या जातील. त्यातून त्यांना इंग्रजी आणि मराठी वाचता येते का? बेरीज, वजाबाकी, गुणाकार आणि भागाकार येतो का हे तपासले जाईल. महिन्यातून एकवेळ क्षमता चाचणी घेवून वर्गातील मुलांना त्या-त्या विषयात पारंगत होण्यासाठी काय करणे अपेक्षित आहे, यावर भर द्यायचा आहे. स्वत: शिक्षक व मुख्याध्यापकांनीच हे काम इमानेइतबारे करून मुलांचा शैक्षणिक विकास घडवून आणण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन वाघमारे यांनी केले.

आकडेवारीतील फरक खपवून घेतला जाणार नाही

शिक्षक व मुख्याध्यापकांनी मुलांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी मुलभूत चाचणी, क्षमता चाचणी घेवून तसा अहवाल पालक अधिकाऱ्यांकडे सोपवावा. शाळांना मी अचानक भेटी देवून तपासणी करेल. त्यावेळी आकडेवारीत गोंधळ किंवा फरक आढळून आल्यास ही बाब खपवून घेतली जाणार नाही, असे सीईओ वैभव वाघमारे म्हणाले.

तुम्हाला कोण हवे, मित्र की शत्रु तुम्ही ठरवा

जिल्हा परिषदेच्या शाळेतील शाळांचा शैक्षणिक दर्जा खालावला असुन ९वी- १०वीच्या बहुतांश विद्यार्थ्यांना साधे वाचता, लिहिता देखील येत नाही. ही बाब अत्यंत गंभीर असून हे चित्र पालटण्यासाठी शिक्षक, मुख्याध्यापकांनी आता सतर्क व्हावे; अन्यथा संबंधितांची गय केली जाणार नाही, असा इशारा जिल्हा परिषदेचे विद्यमान मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांनी दिला. जे शिक्षक व मुख्याध्यापक चांगले काम करतील त्यांच्यासाठी माझ्याएवढा चांगला मित्र कोणी नसणार आणि जे कर्तव्यात कसूर करतील त्यांच्यासाठी माझ्याएवढा शत्रु कोणी नसेल असा थेट संदेशच त्यांनी बैठकीत दिला.

मुख्याध्यापक व अंगणवाडी सेविकांना सीईओ वाघमारे यांचा संदेश - Washim ZP ceo Vaibhav Waghmare addressed zp school principals and Anganwadi Sevika


असाच संदेश सीईओ वाघमारे यांनी अंगणवाडी साविकांशी बोलतांना दिला. चांगले काम करणाऱ्या अंगणवाडी ताईंसाठी मी भाऊ आणि मुलासारखा वागेन पण अंगणवाडीमधील लहान मुलांना घडवतांना त्यांच्या शाररिक व बौध्दिक क्षमता वाढविण्यात हलगर्जिपणा केल्यास संबंधित अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना सेवेतुन कमी करण्यासही मागेपुढे पाहिले जाणार नसल्याचे ते म्हणाले.

मुख्याध्यापकांच्या बैठकीला अति. मुख्य कार्यकारी अधिकारी किरण गणेश कोवे, शिक्षण अधिकारी राजेंद्र  शिंदे, उप शिक्षण अधिकारी गजानन डाबेराव यांची उपस्थिती होती.  उन्हाचा पारा वाढल्याने अंगणवाडी सेविकांची बैठक जि. प. च्या वसंतराव नाईक सभागृहात घेतली. जागेअभावी अंगणवाडी सेविकांना दाटीवाटीने बसावे लागले तर काहींना उभे रहावे लागले. सुरुवातीलाच त्यांच्याशी बोलतांना साऊंड व्यवस्था आणि बैठक व्यवस्थेच्या गैरसोयी बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वाघमारे यांनी दिलगिरी व्यक्त केली. बैठकीला महिला बाल कल्याण विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे, विस्तार अधिकारी अनिल उल्हामाले , बालविकास प्रकल्प अधिकारी प्रियंका गवळी, सारिका देशमुख, पंकज ननावरे, नितीन लुंगे, अमिता गिऱ्हे यांची उपस्थिती होती.

No comments

Powered by Blogger.