Header Ads

Showing posts with label manora news. Show all posts
Showing posts with label manora news. Show all posts

मानोरा तालुक्यातील कोरोना चाचणी, लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा · लसीकरण केंद्र, प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी वाशिम, दि. ०६ (जिमाका) : कोरोना संसर्ग नियंत्रणासाठी जिल्ह्यात विविध उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या अंतर्गत जिल्ह्यात कोरोना चाचण्यांची संख्या वाढविणे व लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली असून मानोरा तालुक्यात या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ६ एप्रिल रोजी मानोरा तहसील कार्यालय येथे झालेल्या बैठकीत आढावा घेतला. तसेच तालुक्यातील लसीकरण केंद्रांना भेटी देवून पाहणी केली. यावेळी उपविभागीय अधिकारी राहुल जाधव, तहसीलदार शारदा जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सागर जाधव यांच्यासह पंचायत समिती, नगरपंचायत व पोलीस विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, मानोरा तालुक्यातील लसीकरण मोहीम अधिक गतिमान करणे आवश्यक आहे. यासाठी ग्रामस्तरीय समिती, अंगणवाडी सेविका, आशा कर्मचारी, महिला बचतगट, संबंधित गावातील शाळेचे शिक्षक यांची मदत घेवून कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेची माहिती प्रत्येक पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. यासाठी महसूल, ग्रामविकास, आरोग्य, महिला व बालविकासविभागाने समन्वयाने काम करावे. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र असलेल्या गावांमधील प्रत्येक पात्र व्यक्तीचे लसीकरण येत्या काही दिवसांत पूर्ण करण्यावर भर द्यावे. तसेच लगतच्या गावातील लोकांना लसीकरणाकरिता येण्यास आवाहन करावे. तालुक्यातील बाधित व्यक्तींचा शोध घेवून त्यांचे विलगीकरण करण्यासाठी कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर द्यावा. तसेच शासनाच्या निर्देशानुसार प्रतिबंधित क्षेत्र तयार करून या क्षेत्रातील प्रत्येक व्यक्तीची कोरोना चाचणी करावी. लोकांच्या सतत संपर्कात येणारे दुकानदार, भाजीपाला विक्रेते तसेच महिला बचतगटाच्या महिला यांची सुद्धा ठराविक कालावधीत पुन्हा कोरोना चाचणी करणे आवश्यक आहे. कोरोना चाचण्यांची संख्या वाढविण्यासाठी ग्रामस्तरीय समितीने विशेष प्रयत्न करावेत, असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यावेळी म्हणाले. लसीकरण केंद्र, प्रतिबंधित क्षेत्राची पाहणी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी मानोरा तालुक्यातील साखरडोह, तळप, पोहरादेवी, शेंदुरजना आढाव येथील कोरोना लसीकरण केंद्रांना भेट दिली. तसेच येथील आशा कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी व लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांशी संवाद साधून लसीकरण मोहिमेची माहिती घेतली. तसेच कोरोना प्रतिबंधक लस पूर्णतः सुरक्षित असून ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी ही लस घ्यावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. जिल्हाधिकाऱ्यांनी मानोरा शहरातील मदिना नगर येथील प्रतिबंधित क्षेत्राला भेट देवून तेथील उपाययोजनांची माहिती घेतली.

4/06/2021 07:49:00 PM
मानोरा तालुक्यातील कोरोना चाचणी, लसीकरण मोहिमेचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा लसीकरण केंद्र, प्रतिबंधित क्षेत्रांना भेटी वाशिम, दि. ०६ (जिम...Read More
Powered by Blogger.