मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त वाशिममध्ये रक्तदान शिबिर, कार्यप्रदर्शनी व ७५ क्रमांकाची मानवसाखळी - Blood donation camp, human chain 75 number on the occasion of Modiji's birthday in Washim
मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त वाशिममध्ये रक्तदान शिबिर, कार्यप्रदर्शनी व 75 क्रमांकाची मानवसाखळी
वाशिम दि.१७ (www.jantaparishad.com) - देशाचे लोकप्रिय व लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीतर्फे देशभरात सेवा पंधरवाडा उपक्रम राबविला जात आहे. त्याचा भाग म्हणून वाशिम शहरात जिल्हा व शहराच्या वतीने रक्तदान शिबिर तसेच मोदीजींच्या जीवनकार्यावर आधारित कार्यप्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाला सकाळपासूनच नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले. मोदीजींच्या सेवाभावी कार्याने प्रेरित होऊन “सेवा हीच खरी शुभेच्छा” या भावनेतून अनेकांनी रक्तदान केले.
विशेष आकर्षण म्हणून भाजपाच्या कार्यकर्त्यांनी ‘75’ क्रमांकाची मानवसाखळी उभी केली. भगवा टोपी परिधान करून महिला व पुरुष कार्यकर्त्यांनी केलेली ही साखळी वरून पाहताना अप्रतिम दिसत होती. घोषणाबाजी आणि देशभक्तीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. या अनोख्या उपक्रमातून मोदीजींप्रती प्रेम, आदर आणि शुभेच्छांचा भाव व्यक्त झाला.
या कार्यक्रमाला भाजपा जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चितलांगे, माजी आमदार विजयराव जाधव, माजी आमदार पुरुषोत्तम राजगुरू, भाजपा नेते राजू राजे पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व मंडळ अध्यक्ष, मोर्चा अध्यक्ष, प्रकोष्ठ अध्यक्ष, तसेच जिल्हा व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला भव्यता लाभली.
कार्यक्रमाचे नियोजन भाजपा वाशिम शहराध्यक्ष मनिष मंत्री यांनी व्यवस्थित पार पाडली. जिल्हाध्यक्ष पुरुषोत्तम चित्तांगे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी शिस्तबद्धतेने सर्व उपक्रम पार पाडले, ज्यामुळे कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.
यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी स्वतः रक्तदान करून मोदीजींना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. “मोदीजींच्या प्रेरणेने समाजासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली, हेच आमच्यासाठी आनंदाचे आहे” असे मत रक्तदात्यांनी व्यक्त केले.
शहरात रक्तदान शिबिर व कार्यप्रदर्शनी आयोजित झाल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले. कार्यप्रदर्शनीत मोदीजींच्या बालपणापासून आजवरच्या कार्याचा आढावा मांडण्यात आला होता. विद्यार्थ्यांनी व नागरिकांनीही मोठ्या संख्येने प्रदर्शनीला भेट दिली.
या उपक्रमातून मोदीजींच्या जीवनकार्याची प्रेरणा घेऊन समाजसेवा, राष्ट्रसेवा आणि जनकल्याणाचा संकल्प सर्व कार्यकर्त्यांनी अधिक दृढ केला. आगामी दिवसांत सेवा पंधरवाडा उपक्रमांतर्गत आणखी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.


Post a Comment