माय भारत योजनेद्वारे नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरू - My Bharat Yojana Civil Defence Volunteer Registration
तरुणांसाठी राष्ट्रीय सेवा संधी
माय भारत योजनेद्वारे नागरी संरक्षण स्वयंसेवक नोंदणी सुरू
My Bharat Yojana Civil Defence Volunteer Registration
सारंग मेश्राम यांचे आवाहन
वाशिम, दि. 15 मे (जिमाका) – माय भारत, भारत सरकारच्या युवा व्यवहार व क्रीडा मंत्रालय (नवी दिल्ली) अंतर्गत नागरी संरक्षण स्वयंसेवक म्हणून नोंदणी करण्यासाठी देशभरातील तरुणांना सक्रियपणे एकत्रित केले जात आहे. (My Bharat Yojana Civil Defence Volunteer Registration) हा देशव्यापी उपक्रम तरुण नागरिकांना राष्ट्रीय कार्यात सहभागी करून घेण्याचा आणि विशेषतः आणीबाणी व संकटाच्या वेळी महत्त्वाची भूमिका पार पाडण्यासाठी सक्षम करण्याचा प्रयत्न आहे.
नैसर्गिक आपत्ती, अपघात, सार्वजनिक आणीबाणी आणि इतर अनपेक्षित परिस्थितीत नागरी प्रशासनास सहकार्य करू शकणारे एक प्रशिक्षित, प्रतिसादक्षम व लवचिक स्वयंसेवक दल तयार करणे, हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.
सध्याची परिस्थिती आणि वाढत्या सुरक्षा चिंता लक्षात घेता, एक मजबूत समुदायाधारित प्रतिसाद यंत्रणा उभारण्याची निकड आहे. नागरी संरक्षण स्वयंसेवक स्थानिक प्रशासनाला बचाव व निर्वासन, प्रथमोपचार, आपत्कालीन काळजी, वाहतूक नियंत्रण, गर्दी नियंत्रण, सार्वजनिक सुरक्षा आणि आपत्ती निवारण तसेच पुनर्वसन अशा विविध सेवा देण्यामध्ये मोलाची मदत करतात.
माय भारत हे मिशन तयार आणि प्रशिक्षित नागरी दल उभारण्यासाठी वचनबद्ध असून, तरुण स्वयंसेवकांच्या गतिशील जाळ्याला आणि या सेवेत योगदान देऊ इच्छिणाऱ्या नवोदित तरुणांना यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करते.
या उपक्रमामुळे तरुणांमध्ये नागरी जबाबदारी व शिस्त यांची जाणीव होते, शिवाय त्यांना जीवन वाचवणारी कौशल्ये व संकटाच्या वेळी त्वरीत प्रतिसाद देण्याचे प्रशिक्षणही मिळते.
नोंदणीसाठी अधिकृत संकेतस्थळ: https://mybharat.gov.in
नोंदणी प्रक्रिया सोपी आणि सर्वांसाठी खुली आहे. तरुणांनी पुढे येऊन या राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा युवा अधिकारी सारंग मेश्राम यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी संपर्क:
सारंग मेश्राम, जिल्हा युवा अधिकारी, माय भारत केंद्र, वाशिम.
मो. 77090 31660
Post a Comment