Hemophilia treatment Centers in every district to be started - हिमोफिलिया वरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू होणार
हिमोफिलिया वरील उपचारांसाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र सुरू होणार
सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांची माहिती
मुंबई, दि. 2 : हिमोफिलिया हा अनुवंशिक रक्तदोषामुळे होणारा आजार आहे. या आजाराच्या रुग्णांचा तपास, निदान व उपचारासाठी राज्यात नऊ ठिकाणी केंद्र असून येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात हे केंद्र सुरू करण्यात येईल, (Hemophilia treatment Centers in every district to be started) असे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत (Health Minister Dr. Tanaji Sawant) यांनी विधानपरिषदेत सांगितले.
सदस्य उमा खापरे यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती.
प्रा.डॉ.सावंत म्हणाले की, या रूग्णांमध्ये रक्त गोठण्याच्या फॅक्टर आठ आणि नऊ ची कमतरता असते. त्यामुळे अतिरक्तस्त्राव होतो. स्त्रिया या हिमोफिलिया आजाराच्या वाहक असतात तर पुरूषांना याची लक्षणे दिसून येतात. अशा रूग्णांना शिरेद्वारे फॅक्टर देण्यात येतात. राज्यात सध्या जिल्हा रूग्णालय ठाणे, नाशिक, सातारा, अमरावती, औरंगाबाद, अहमदनगर आणि डागा स्त्री रूग्णालय नागपूर, केईएम रूग्णालय मुंबई आणि बी.जे.वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे या आजारावर मोफत उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. या डे-केअर सेंटरमध्ये एकूण 5962 रूग्णांची नोंदणी करण्यात आलेली आहे.
सद्यस्थितीत विभागामार्फत नऊ केंद्रांना हिमोफिलिया फॅक्टरचा पुरवठा करण्यात येतो. या फॅक्टर्सच्या खरेदीसाठी केंद्र सरकारकडून सन 2022-23 मध्ये 27 कोटी इतका निधी प्राप्त झाला. तर 2023-24 मध्ये 55 कोटी रूपये इतका निधी मंजूर असून त्याची खरेदीप्रक्रिया राज्यस्तरावर सुरू आहे. येत्या काळात सर्व जिल्ह्यांत डे-केअर केंद्र सुरू करून औषधपुरवठा करण्यात येणार असल्याचे मंत्री प्रा.डॉ.सावंत यांनी सांगितले.
या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य महादेव जानकर, डॉ.मनीषा कायंदे यांनी सहभाग घेतला.
Post a Comment