Amrut Mofat Pravas and Mahila Samman Yojana by MSRTC - A great Success : अमृत मोफत प्रवास अन् महिला सन्मान योजनांमुळे ‘एसटी’ला नवसंजीवनी..!
अमृत मोफत प्रवास अन् महिला सन्मान योजनांमुळे ‘एसटी’ला नवसंजीवनी..!
Amrut Mofat Pravas and Mahila Samman Yojana by MSRTC - A Great Success
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वय वर्ष 75 व त्या पुढील वयाच्या नागरिकांसाठी राज्य परिवहन (एस.टी.) महामंडळाच्या माध्यमातून “अमृत मोफत प्रवास” योजना (Amrut Mofat Pravas Yojana) आणि महिलांसाठी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत (50% Concession in MSRTC Bus) असलेली “महिला सन्मान” (Mahila Samman Yojana) ही महिला विशेष अशा दोन स्वतंत्र योजना सुरु केल्या. या योजनांना संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनांमुळे राज्य परिवहन महामंडळाला जणू नवसंजीवनीच मिळाली आहे. या योजनांना मिळणाऱ्या प्रतिसादामुळे महामंडळाच्या तिजोरीत भरमसाठ वाढ होताना दिसून येत आहे. या लेखाच्या माध्यमातून रायगड विभागातील राज्य परिवहन महामंडळाच्या सद्य:स्थितीचा लेखाजोखा मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
रायगड विभागात एस. टी. महामंडळाला अमृत योजनेंतर्गत एप्रिल 2023 मध्ये 1 लाख 51 हजार 701 इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला. त्यातून 62 लाख 88 हजार 637 एवढे उत्पन्न मिळाले. माहे मे 2023 या महिन्यात 1 लाख 54 हजार 115 इतक्या जेष्ठ नागरिकांनी प्रवास केला. यातून राज्य परिवहन महामंडळाच्या रायगड विभागाला 71 लाख 51 हजार 256 एवढे उत्पन्न मिळाले. माहे जून 2023 मध्ये 1 लाख 47 हजार 909 इतक्या ज्येष्ठ नागरिकांनी प्रवास केला आणि त्यातून रु.67 लाख 87 हजार 537 इतके उत्पन्न मिळाले आहे.
महिला सन्मान योजनेंतर्गत प्रवास भाड्यातील 50 टक्के सवलतीमुळे महिला प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळत असून रायगड विभागात एप्रिल 2023 मध्ये 15 लाख 32 हजार 880 इतक्या महिला प्रवाशांनी या योजनेचा लाभ घेतला. यातून रु.3 कोटी 16 लाख 48 हजार 613 उत्पन्न मिळाले. माहे मे 2023 महिन्यामध्ये महिला प्रवाशांची संख्या वाढून ती 17 लाख 70 हजार 45 झाली. त्यातून रु.4 कोटी 17 लाख 17 हजार 410 उत्पन्न मिळाले. माहे जून 2023 महिन्यामध्ये 14 लाख 85 हजार 66 महिलांनी प्रवास केला त्यातून रु.3 कोटी 25 लाख 86 हजार 562 इतके उत्पन्न रायगड विभागाला मिळाल्याची माहिती पेण विभाग नियंत्रक दिपक घोडे यांनी दिली आहे.
समाजाचा एक महत्वाचा घटक असलेल्या ज्येष्ठांसाठीच्या “अमृत मोफत प्रवास” योजने (Amrut Mofat Pravas) मुळे तसेच महिलांच्या सन्मानार्थ सुरु केलेल्या “महिला सन्मान” योजनेमुळे एस. टी.महामंडळा (Mahila Samman Yojana by MSRTC ) ची प्रवासी वाहतूक बस पूर्ण क्षमतेने भरली जाते तसेच शासनाकडून मिळणाऱ्या परताव्यामुळे एस. टी. महामंडळाचे उत्पन्न दिवसेंदिवस वाढत आहे. यातून एस. टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांचाही उत्साह वृद्धींगत होत असून एस.टी. प्रवाशांना अधिकाधिक उत्तम सेवा देण्यासाठी त्यांनाही मानसिक बळ मिळत आहे. यातून एक सकारात्मक उर्जा निर्माण होवून एस.टी. महामंडळ आणि प्रवासी यांच्यात जिव्हाळ्याचे नाते निर्माण होण्यास प्रोत्साहन मिळत आहे.
- मनोज शिवाजी सानप, जिल्हा माहिती अधिकारी,रायगड-अलिबाग
Post a Comment