Header Ads

26 June : Amali Padarth Virodhi Diwas - २६ जून : अमली पदार्थ विरोधी दिवस

26 June : Jagtik Amali Padarth Virodhi Diwas - २६ जून : अमली पदार्थ विरोधी दिवस


26 जून : अमली पदार्थ विरोधी दिवस 

26 June : Jagtik Amali Padarth Virodhi Diwas

26 June : International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking

        देशाचे भविष्य असलेली आजची युवा पिढी ही अमली पदार्थ सेवनाच्या आहारी जात आहे. हे आपण दररोज कुठल्या वृत्तपत्रातून तर कुठल्या वृत्त वाहिण्यातून वाचत ऐकत असतो. आज पालकांना आपल्या पाल्यांना अमली पदार्थाच्या सेवनापासून कसे वाचवावे,हा प्रश्न निर्माण झाला आहे. मोठ्या प्रमाणात देशातील युवा पिढीला अमली पदार्थाच्या विळख्यातून कसे मुक्त करता येईल यासाठी शासन गंभीर आहे.

           देशाच्या सीमेवरून, सागरी मार्गाने व प्रसंगी हवाई मार्गाने अमली पदार्थ छुप्या पद्धतीने देशात येत असल्याचे चित्र आपण विविध ठिकाणी केलेल्या कारवाईवरून बघत असतो. सीमेवर भारतीय सैन्य,समुद्र मार्गावर तटरक्षक दल व विमानतळावर सुरक्षारक्षकांनी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडल्याच्या बातम्या देखील आपण वाचत असतो. अमली पदार्थावर शासनाने बंदी घातली आहे.देशाच्या सीमाच काय तर जिल्ह्यातसुद्धा अमली पदार्थाची तस्करी, सेवन व लागवड होणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन विविध यंत्रणांना सोबत घेऊन काम करताना दिसते.   

           आजची युवा पिढी व्यसनाच्या आहारी जाणार नाही यासाठी अमली पदार्थाच्या सेवनाच्या दुष्परिणामाची माहिती शाळा व महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना देऊन जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. 26 जून हा जागतिक अमली पदार्थ विरोधी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. (26 June : Jagtik Amali Padarth Virodhi Diwas / 26 June : International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking) या दिवसाचे औचित्य साधून युवा वर्गामध्ये अमली पदार्थविरोधी जागरूकता निर्माण करण्यात येते. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 47 मध्ये सार्वजनिक आरोग्य आणि नागरिकांच्या आरोग्य रक्षणासाठी मादक पदार्थावरील बंदीची मार्गदर्शक तत्वे समाविष्ट केली आहे.

                  महाराष्ट्राने आपले व्यसनमुक्ती धोरण निश्चित केले आहे. 17 ऑगस्ट 2011 च्या शासन निर्णयाद्वारे महाराष्ट्राचे व्यसनमुक्ती धोरण जाहीर केले आहे. सन 1987 पासून संयुक्त राष्ट्र संघाने अमली पदार्थ हा महत्त्वाचा विषय मानला आहे.देशात नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ऍक्ट 1985 (एन.डी.पी.एस) हा अमली पदार्थ विरोधी कायदा केला आहे. सन 1961 मध्ये पहिले अमली पदार्थावर आधारित संमेलन झाले.अवैध सायकोट्रापिक पदार्थावर आधारित दुसरे संमेलन सन 1971 मध्ये झाले. सन 1988 मध्ये गैरकानुनी व्यवसाय विरोधात तिसरे संमेलन झाले. 

एनडीपीएस ऍक्ट 1985 या अमली पदार्थ विरोधी कायद्यांतर्गत अमली वस्तू किंवा औषधांचे उत्पादन, वितरण,सेवन,विक्री करणे,त्याची वाहतूक करणे,त्याचा साठा करणे, त्याचा वापर करणे व त्याची आयात निर्यात करणे यावर भारतात बंदी आहे.

              अमली पदार्थाच्या विरोधात प्रत्येक युवक युती नागरिक व पालकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग विविध कार्यक्रम व उपक्रमांचे आयोजन करीत असतो. अमली पदार्थ त्यालाच म्हणतात,ज्या पदार्थाच्या सेवनामुळे माणसाला गुंगी, नशा किंवा धुंदी येते.अफु व त्यापासून मॉर्फिन,हेरॉइन तसेच कोकेन,भांग, गांजा व चरस या पदार्थाचा अमली पदार्थात समावेश केला जातो.ब्राऊन शुगर व स्पिरिटचाही नशेसाठी वापर केला जातो.सिंथेटिक व एमडीचा (मेफेड्रॉन) नशेसाठी श्रीमंत लोक वापर करू लागले आहे. तसेच एलसीडी, मारीजुआना,म्याव- म्याव, डरनेक्स,शीलावती,मॅजिक मश्रुम, वेदनाशामक गोळ्या,व्हाइटनर व काही औषधांचाही वापर नशेसाठी करण्यात येतो. भारतात अमली पदार्थ वापरणे, त्याचे सेवन करणे हा गुन्हा आहे.किती दंड करावा हे त्याच्या वापरावर अवलंबून आहे.

               एखादा व्यक्तीला अमली पदार्थ बाळगल्यासाठी किंवा सेवन केल्यामुळे शिक्षा झाली असेल आणि त्या व्यक्तीला अमली पदार्थाच्या सेवनाच्या विळख्यातून मुक्त व्हायचे असेल अर्थात त्याला सुधारण्याची इच्छा असेल तर तो व्यक्ती एखाद्या व्यसनमुक्ती केंद्रात जाऊन उपचार घेऊ शकतो.त्याने जर उपचार मध्येच थांबवले आणि पुन्हा अमली पदार्थाच्या सेवनाकडे वळला तर त्याला पुन्हा शिक्षा होऊन शकते. 

           अमली पदार्थ सेवनाचे प्रमाण शहरी भागात ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे.शहरी भागात झोपडपट्ट्या, समुद्रकिनाऱ्यावरील झोपडपट्ट्या, मोठ्या उड्डाण पुलाच्या खाली वस्त्यांमध्ये नशा करणारे टोळके दिसून येतात. तसेच गुन्हेगारी विश्वातील लोकसुद्धा अमली पदार्थाचे सेवन करतात. नशा आणणारे अमली पदार्थ खरेदी करण्यासाठी चोरी, लूटमार व महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकवून आपले अमली पदार्थ सेवनाची नशा ते पूर्ण करतात. 

               आज तर श्रीमंत घरातील लोकसुद्धा अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेल्याचे दिसून येत आहे. केवळ उत्सुकतेपोटी अमली पदार्थाची चव चाखणारेसुद्धा अमली पदार्थ सेवनाच्या विळख्यात सापडले आहे. अभ्यास करताना झोप येऊ नये, यासाठी मुले - मुली अमली पदार्थाच्या आहारी गेले आहे.आज अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या युवा पिढीला या गर्तेतून बाहेर काढणे आज काळाची गरज आहे. 

              भारतात तर पाकिस्तान, बांगलादेश,नेपाळ,भूतान व अफगाणिस्तान सीमेतून चोरट्या मार्गाने अमली पदार्थ पाठविले जातात. नायजेरियातूनसुद्धा मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाची भारतात तस्करी केली जाते.अमली पदार्थ सेवनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीच्या वर्तणुकीत अचानक बदल दिसून येतो. मुले जर अमली पदार्थाच्या आहारी गेली तर अभ्यास,खेळ व अन्य कार्यक्रमात त्यांचे मन रमत नाही. शाळेच्या उपस्थितीवर देखील त्यांच्या परिणाम होतो. पैसे मिळण्यासाठी पालकांकडे ती सातत्याने मागणी करतात.घरातील वस्तूंची ते चोरी करण्यास मागेपुढे पाहत नाही. डोळे लाल,निस्तेज होणे, डोळ्याखाली सूज येणे,बोलताना अडखळणे, उभे राहण्यासाठी त्रास होणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, निद्रानाश, कपड्यांबद्दल व व्यक्तिगत स्वच्छतेबद्दल बेफिक्रेने वागतात. व्यसनाचा परिणाम व्यक्तीच्या फुफ्फुस आणि स्मरणशक्ती होतो. अवयव निकामी होतात.व्यक्तींमध्ये अस्वस्थता व मानसिक आजार वाढतात.

          आपल्या पाल्याना लागलेल्या अमली पदार्थाच्या सेवनाला आळा घालण्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना समजून घेणे महत्त्वाचे आहे. पालकांनी त्यांच्याशी मित्र म्हणून वागले पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय या गोष्टी मित्रत्वाच्या नात्याने त्यांना पटवून दिल्या पाहिजे. त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याशी प्रेमाने वागून प्रेमाची वागणूक दिली पाहिजे. वेळीच त्यांची वाईट मित्रांपासून संगत तोडली पाहिजे. शाळेत शिक्षकांनी मुलाला कमी लेखले तर मुले व्यसनाकडे वळतात. मानसोपचार तज्ञांकडून मुलांचे समुपदेशन केले पाहिजे.मानसोपचार तज्ञांच्या मते अमली पदार्थाचे सेवन हा एक मानसिक आजार असून त्याचा वाईट परिणाम हा त्या व्यक्तीच्या आयुष्यात होतो. सोबतच कुटुंब आणि समाजावर देखील होत असतो.

           सर्व व्यसनांवर निश्चितच उपचार आहे. अमली पदार्थांच्या व्यसनातून सहजपणे बाहेर येण्यासाठी मानसोपचार तज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. प्रत्येकाने अमली पदार्थापासून दूर राहिले पाहिजे. मनुष्य जीवन हे सुंदर आहे. कारण ते एकदाच मिळत असते. त्यामुळे हे जीवन सुंदर बनविण्यासाठी आरोग्याला महत्त्व देणे आवश्यक आहे.  

- विवेक खडसे, जिल्हा माहिती अधिकारी, वाशिम

- Vivek Khadase, District Information Officer (DIO), Washim 

No comments

Powered by Blogger.