Header Ads

31 May : World No Tobacco Day Marathi Lekh - लेख : ३१ मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन - सक्षम भारताचा एकच नारा, नको तंबाखूला थारा

31 May : World No Tobacco Day Marathi Lekh - लेख : ३१ मे : जागतिक तंबाखू विरोधी दिन - सक्षम भारताचा एकच नारा, नको तंबाखूला थारा


सक्षम भारताचा एकच नारा, नको तंबाखूला थारा

        भारतात इतर देशांच्या मानाने तंबाखूमुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या दरवर्षी वाढत असल्‍याचा अंदाज आहे. दि. ३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन (31 May : World No Tobacco Day Marathi Lekh) च्या पार्श्वभूमिवर जिल्हा मुख आरोग्य अधिकारी डॉ. रोहन वायचळ लिखित हा लेख (Lekh / Nibandh)… 

या वर्षीचे घोषवाक्य वुई नीड फूड, नॉट टोबॅको आहे.

World No Tobacco Day 2023 Theme : We Need Food, Not Tobacco

        तंबाखूमुळे दर 8 सेकंदाला ‘एक’ मृत्यू घडतो. भारतात, तंबाखू संबंधित मृत्‍युची एकूण संख्या दर वर्षी ८ ते ९ लाख इतकी असेल. तंबाखूपासून दूर राहिल्यास एक किशोर/किशोरीचा जीवनकाळ 20 वर्षाने वाढू शकेल.

तंबाखूच्या सेवनाने अनेक दुष्परिणाम :-

        तोंडाचा कर्करोग, ओठाचा, जबड्याच्या, फुफ्फुसाचा, घशाचा, पोटाचा, किडनीचा व मूत्राशयाचा कॅन्सर इत्यादी तंबाखू सेवनाने होतात. भारतात तंबाखू सेवनामुळे तोंडाचा कॅन्सर होणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. ९० टक्के फुफ्फुसाचा कॅन्सर आणि इतर कॅन्सर होण्याचे कारण हे धूम्रपान आहे.

            भारतात तंबाखूच्‍या सेवनामुळे तोंडाचा कर्करोग असलेल्‍या रूग्‍णांची संख्‍या सर्वांत मोठी आहे. भारतात, ५६.४ % स्त्रियांना आणि ४४.९ % पुरुषांना तंबाखूमुळे कर्करोग झाल्याचे आढळून आले आहे. भारतात ८२ % फुफ्फुसाच्‍या दीर्घकालीन रोगांचे कारण धूम्रपान हे आहे.

            तंबाखू हे क्षयरोग होण्‍याचे अप्रत्यक्ष कारण आहे. कधी-कधी धूम्रपान करणाऱ्यांमध्ये देखील टीबी, तिप्पट अधिक आढळतो. सिगरेट किंवा बिड़ीचे धूम्रपान, जितके अधिक, तितके अधिक टीबीचे प्रचलन वाढू शकते. धूम्रपान/ तंबाखूचे सेवन अचानक रक्तदाब वाढविते आणि हदयाकडे जाणारा रक्तपुरवठा कमी करते.

            यामुळे पायाकडे होणाऱ्या रक्तप्रवाहात देखील कमतरता येते आणि पायात गैंग्रीन होऊ शकते. तंबाखू संपूर्ण शरीराच्या धमन्‍यांच्‍या पापुद्र्याला नुकसान पोहोचवते.

            मुलांच्या आरोग्यावर धूम्रपानाचा वाईट परिणाम होतो आणि कुटुंबातल्‍या इतर सदस्यांवर देखील धूम्रपानाच्या धुराने त्रास होतो. धूम्रपान न करणारा पण २ पाकिट रोज धूम्रपान करणाऱ्या बरोबर राहिल्यास, न करणा-यास रोज ३ पाकिट धूम्रपान करणाऱ्याइतका त्रास होतो, हे लघवीच्या निकोटिनच्या पातळीचा अभ्यास करता आढळून आले.

            तंबाखू किंवा धुम्रपानामुळे मधुमेह होण्‍याची शक्यता जास्त बळावते. तंबाखूमुळे रक्तातील चांगले कोलॅस्ट्राॅलचे प्रमाण कमी होते. धूम्रपान करणारे/तंबाखू सेवन करणारे यांच्यात, धूम्रपान न करणाऱ्यांच्या तुलनेत हृदय रोग व पक्षाघात होण्याचा धोका 2 ते 3 पट अधिक वाढतो.

            धूम्रपान / तंबाखूचे स्त्री व पुरुषांवर दुष्परिणाम होतात. याचे सेवन पुरुषांमध्ये नपुंसकतेचे कारण आहे. धूम्रपान / तंबाखूचे सेवन स्त्रियांमध्ये इस्ट्रोजनची पातळी कमी करते व रजोनिवृत्ति लवकर होते. धूम्रपान / तंबाखूचे सेवन शारीरिक ताकद कमी करते आणि त्यामुळे सहनशीलता ढासळते. ज्या स्त्रिया धूम्रपान करतात आणि गर्भनिरोधके घेतात त्यांच्यात स्ट्रोकचा धोका वाढतो.

            ज्या गरोदर स्त्रिया, धूम्रपान करतात, त्यांच्यात गर्भपाताची शक्‍यता वाढते, किंवा मूल कमी वजनाचे होते, किंवा बाळाच्या विकासात्मक समस्या वाढतात, किंवा बाळाचा अचानक मृत्यु देखील ओढवू शकतो. (अचानकपणे झालेला अनाकलित मृत्यु).

तंबाखू सोडण्याचे शारीरिक फायदे

        तुमच्यातील कँसर वा हदयरोग होण्याचे धोके कमी होतात. हदयावर येणारा दाब कमी होतो. तुमच्या धूम्रपान करताना सोडलेल्या धुराचा त्रास तुमच्या आपल्यांवर होणार नाही. तुम्हाला धूम्रपानामुळे होणारा खोकला (सारखा होणारा खोकला व कफ) नाहीसा होईल. तुमचे दात स्वच्छ व शुभ्र होतील.

सामाजिक फायदे

        तुम्ही स्वतः नियंत्रक व्हाल, सिगारेट तुमच्यावर नियंत्रण ठेवणार नाही. तुमची आत्‍म-शक्ती तथा आत्मविश्वास वाढेल. आज व या नंतर भविष्यात तुम्ही तुमच्या मुलांसाठी एक निरोगी पालक (पिता/माता) बनाल. तुमच्याकडे इतर गोष्टींवर खर्च करण्यासाठी पैसा असेल.

धूम्रपान/तंबाखू सोडण्यासाठी युक्त्या

  • ऐशट्रे, सिगरेटी, पान, ज़र्दा लपवून ठेवा, जे नजरेसमोर नसते ते आठवत पण नाही. हा एक सोपा, परंतु सहाय्यक उपाय आहे. सिगारेट, पान आणि ज़र्दा लवकर मिळतील अशा ठेवू नका. सिगरेटी, पान आणि ज़र्दा अशा जागी ठेवा जेथून तुम्हाला काढणे वा सापडणे अवघड पडेल. उदाहणार्थ, दुस-या खोलीत, किंवा तुम्ही नेहमी जात नाही अशा जागी, कुलुपाच्या कपाटात इ.
  • धूम्रपान करण्यासाठी प्रेरित करणाऱ्या कारणांना ओळखा किंवा त्या ऐवजी पान खा / जर्दा खा आणि दुसरे उपाय शोधा.
  • तुमचा कंपू किंवा गट, सिगरेटी, पान, ज़र्दा खातो कां ? असे असल्यास पहिल्यांदा त्यांना टाळायचा प्रयत्न करा किंवा ते जेव्हा, सिगारेट, पान, ज़र्दा खात असतील तेव्हा त्यांच्या पासून दूर व्हा.
  • तोंडात च्‍युइंगम, चॉकलेट, पे‍परमिंट, लॉज़ेंजेस  ठेवण्याचा प्रयत्न करा व दीर्घ श्वास घेण्याचा सराव करा.
  • जेव्हा तल्लफ येईल तेव्हा, उभ्याने किंवा बसलेल्या अवस्थेत दीर्घ श्वास घ्या. एक पेला पाणी प्या आणि व्यायामाने देखील तल्लफ घालवण्यास मदत होते. जेव्हा तंबाखू सेवनाची तल्लफ येईल तेव्हा, तुमच्या मुलांबद्दल आणि त्यांच्या भवितव्याबद्दल विचार करा व तुमच्यावर तंबाखुमुळे होणा-या भयंकर रोगांचा विचार करा.
  • सेवन थांबवण्याची एक तारीख ठरवा. मदतनीसाची मदत घ्या. तुमचे वेळा-पत्रक सिगरेट, पान, ज़र्दा सोडून आखा.
  • जेव्हा तुम्हाला धूम्रपान/तंबाखूची तल्लफ लागेल तेव्हा काहीतरी वेगळे करायचा प्रयत्न करा. दोन सिगारेट पिण्यामध्ये विलम्ब करा. दीर्घ श्वास घ्या. पाणी प्या. स्‍वतःसाठी सकारात्मक बोला. स्वतःला पुरस्कृत करा. दररोज आरामाच्या तंत्रांचा वापर करा जसे (योग, चालणे, ध्यानधारणा, नृत्य, संगीत इत्यादी). कॅफीन आणि अल्कोहलचे सेवन सीमित करा.
  • या व्यतिरीक्त, सक्रिय बना आणि पोषक आहार करा नियमित व्यायाम करा निरोगी व स्वस्थ तंदुरुस्त जीवन जगा.

- डॉ. रोहन वायचळ,

जिल्हा मुख आरोग्य अधिकारी, सोलापूर   

No comments

Powered by Blogger.