Header Ads

शहीद अमोल गोरेला साश्रृनयनांनी अखेरचा निरोप - Shahid Amol Gore anantat vilin



शहीद अमोल गोरेला साश्रृनयनांनी अखेरचा निरोप

स्वयंस्फूर्तीने वाशीमची प्रतिष्ठाने बंद

रस्त्याच्या दूतर्फा नागरिकांची उपस्थिती

         वाशिम, दि. 19 (जिमाका) : अरुणाचल प्रदेशात कमेंग व्हॅली येथे भारत-चीनच्या सिमेवर देशाच्या रक्षणार्थ तैनात असलेल्या वाशिमजवळील सोनखास येथील सुपुत्र भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचा कमांडो अमोल गोरे ला १७ एप्रिल रोजी वीरमरण आले.  


            आज शहिद अमोलचे पार्थिव पुणे येथून सैन्याच्या वाहनाने वाशिम शहराच्या सीमेत येताच रस्त्याच्या दुतर्फा जमलेल्या नागरिकांनी शहीद अमोल गोरे अमर रहे, भारत माता की जय, जब तक सुरज चाँद रहेगा, अमोल तेरा नाम रहेगा आणि वंदे मातरमच्या घोषणांनी परिसर देशभक्तीमय झाला होता. वाशिम शहरातील मुख्य मार्गांनी शहीद अमोलचे पार्थिव जात असतांना रस्त्याच्या दुतर्फा उपस्थित असलेल्या नागरिकांनी पार्थिवावर पुष्पांची उधळून करून श्रद्धांजली अर्पण केली.


             शहीद अमोलला श्रद्धांजली म्हणून वाशिम शहरातील सर्व प्रतिष्ठाने स्वयंस्फूर्तीने आज बंद ठेवली होती. दुपारी ३.३० वाजता शहीद अमोलचे पार्थिव त्याच्या सोनखास या मुळगावी पोहचल्यानंतर सर्वप्रथम घरी नेण्यात आले. त्यानंतर गावाजवळच असलेल्या शहीद अमोलच्या शेतात सायंकाळी 5.20 वाजता शासकीय लष्करी इतमामात अंतिम संस्कार करण्यात आले. 



        शहिद अमोलचा चार वर्षाचा मुलगा मयूर याने शहिद अमोलला मुखाग्नी दिला. अंतिम संस्कार प्रसंगी सर्वप्रथम शहीद अमोलचे वडील तान्हाजी गोरे, आई मंदाबाई, पत्नी वैशाली गोरे, मुले मयूर व तेजस, भाऊ हनुमान गोरे, विवाहित बहिण उमेशा भिसडे यांनी पुष्पचक्र वाहिली. जिल्हा प्रशासनाच्या वतीने सहायक जिल्हाधिकारी श्रीमती मिन्नू पी.एम. यांनी शहीद अमोलच्या पार्थिवावर पुष्पचक्र वाहिली. पॅरा युनिटचे मेजर सुबोध राठोड, मेजर अजयसिंग, भारतीय सैन्याच्या तुकडीने हवेत बंदुकीच्या फैरी झाडून मानवंदना दिली. 

        यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहिद अमोलला मुलगा मयूर मुखाग्नी देत असतांना वातावरण शोकाकुल झाले होते.

No comments

Powered by Blogger.