Header Ads

६ व ७ जानेवारीला वत्सगुल्म ग्रंथोत्सव - vatsgulm granthotsav on 6& 7th jan

६ व ७ जानेवारीला वत्सगुल्म ग्रंथोत्सव - vatsgulm granthotsav on 6& 7th jan


६ व ७ जानेवारीला वत्सगुल्म ग्रंथोत्सव

ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, परिसंवाद व कवी संमेलन

       वाशिम, दि. 05 (जिमाका) : ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, वाशिम यांच्या वतीने महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत 6 व 7 जानेवारी 2023 रोजी वत्सगुल्म ग्रंथोत्सवाचे आयोजन श्री शिवाजी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वाशिम येथे करण्यात आले आहे. या ग्रंथोत्सवादरम्यान वाचन संस्कृतीचा प्रचार-प्रसार करण्यासाठी ग्रंथ दिंडी, ग्रंथ प्रदर्शन, ग्रंथ विक्री, परिसंवाद व कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

           6 जानेवारी रोजी सकाळी 9 ते 11 वाजता दरम्यान राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय, वाशिम येथून कार्यक्रम स्थळापर्यंत ग्रंथदिंडी आयोजित करण्यात आली आहे. ग्रंथदिंडीला राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष माधवराव शेवलकर, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष प्रा. भाऊसाहेब काळे, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या ग्रंथपाल  प्रा. प्रज्ञा क्षिरसागर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

           ग्रंथोत्सवाचे उदघाटन सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. अध्यक्षस्थानी पदमश्री नामदेव कांबळे हे असतील. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधिक्षक बच्चन सिंह, ज्येष्ठ साहित्यीक प्रा. धोंडूजा इंगोले यांची उपस्थिती राहणार आहे. दुपारी 3 ते 4.30 वाजेपर्यंत '' वाचन संस्कृतीवर समाज माध्यमांचा प्रभाव '' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. परिसंवादाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. विजय जाधव हे असतील. यामध्ये साहित्यीक मोहन शिरसाठ, पत्रकार प्रा. गजानन वाघ, अरविंद उलेमाले व वाशिमच्या काव्यग्रह प्रकाशनचे व्यवस्थापकीय संपादक विठ्ठल जोशी हे सहभागी होतील. दुपारी 4.30 ते  सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत चेतन सेवांकुर, ऑर्केस्ट्रा, केकतउमरा हे कार्यक्रम सादर करतील.

           7 जानेवारी रोजी सकाळी 10 ते 11 वाजेदरम्यान '' मी वाचन संस्कृती बोलते '' या विषयावर अकोट येथील हर्षदा इंदाने ही बालीका एकपात्री नाटक सादर करणार आहे. सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेपर्यंत '' ग्रंथालय, स्पर्धा परीक्षा आणि आजचा युवक '' या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून अध्यक्षस्थानी विक्रीकर अधिकारी विलास सारसकर हे असतील. यामध्ये धाबे करीअर अकॅडमीचे संचालक राहुल धाबे, अकोला जिल्हा बीज प्रमाणिकरण अधिकारी अभिजीत देवगीरकर, हिवरा आश्रम येथील विवेकानंद विद्यामंदिरचे भगवान राईतकर हे सहभागी होतील.

          दुपारी 2 ते 4 वाजेपर्यंत कवी संमेलन आयोजित करण्यात आले असून अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी महेंद्र ताजने हे असतील. यामध्ये सतिश जामोदकर, हेमंद सावळे, फारुक जमन, परमेश्वर व्यवहारे, अनिल कांबळे, मधुराणी बनसोड, श्रीमती उज्वला मोरे, ग.ना. कांबळे, आर.आर. पठाण, राजेश ठवकर, प्रल्हाद पोळकर, पांडुरंग मोरे, विष्णु जोशी, हंसीनी उचित, सुरेश येरमुळे, गजानन फुसे, महेश देवळे, दत्ता शेळके, डॉ. दिपक ढोले, शेषराव धांडे, प्रा. सुनिता अवचार, रा.मु. पगार व रतन राठोड हे सहभागी होतील. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चाफेश्वर गांगवे व डॉ. विजय काळे हे करतील.

          दुपारी 4 ते सायंकाळी 5 वाजेदरम्यान ग्रंथोत्सवाचा समारोप होणार आहे. या समारोपीय कार्यक्रमाला अमरावती विभागाचे सहायक ग्रंथालय संचालक अरविंद ढोणे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे प्राचार्य संजय पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे प्रमुख कार्यवाहक ग्रंथमित्र प्रभाकरराव घुगे यांची उपस्थिती राहणार आहे. या दोन दिवशीय ग्रंथोत्सवाचा लाभ जिल्हयातील वाचक, साहित्यीक, कवी व नागरीकांनी घ्यावा. असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी राजेश कोलते यांनी केले आहे.     

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.