कारंजा शहरातील बालविवाह रोखला - Prevented child marriage in Karanja city washim district
कारंजा शहरातील बालविवाह रोखला
प्राप्त गुप्त तक्रार जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाने कारंजा (शहर) पोलीस स्टेशनचे मदतीने केली कार्यवाही
कारंजा, www.jantaparishad.com दि. 02 (जिमाका) : कारंजा शहरातील गौतमनगर भागात 2 डिसेंबर रोजी अल्पवयीन बालिकेचा होणारा बालविवाह रोखण्यात जिल्हा बाल संरक्षण कक्षाला यश आले आहे. हा बालविवाह बालिकेच्या पालकांचे समुपदेशन करुन रोखण्यात आला. वाशिम येथील जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयातील जिल्हा बाल संरक्षण कक्षाला या बालविवाहबाबतची गुप्त तक्रार प्राप्त झाली. तात्काळ जिल्हा बाल संरक्षण कक्षाने कारंजा (शहर) पोलीस स्टेशनला संपर्क करुन बालविवाह रोखला. यावेळी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी लक्ष्मी काळे, कायदा तथा परिविक्षा अधिकारी जिनसाजी चौधरी, सामाजिक कार्यकर्ता रमेश वाघ, क्षेत्रिय कार्यकर्ता रमेश वाळले, पोलीस निरीक्षक आधारसिंग सोनोने, पोलीस उपनिरीक्षक बी.सी. रेघीवाले, गिरीधर जाधव, प्रेमसिंग चव्हाण, संरक्षण अधिकारी रुपेश सुरजुसे आदी कर्मचारी कार्यवाही दरम्यान उपस्थित होते.
बालविवाह अधिनियम 2006 नुसार बालविवाह करणे व त्यासंबंधी सोहळे आयोजित करणे व बालविवाहबाबतची माहिती लपविणे गुन्हा असून संबंधितांविरुध्द अधिनियमानुसार दोन वर्षापर्यंतची सक्त मजूरीची शिक्षा व 1 लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो. सुधारीत अधिसूचना 2022 नुसार बालविवाह त्यांच्या परिक्षेत्रात पुर्णपणे रोखणे हे ग्रामसेवक व बालविकास प्रकल्प अधिकारी यांची प्राथमिक जबाबदारी आहे. बालविवाहाला प्रोत्साहन देण्याकरीता राजकीय तंत्राचा वापर करण्यात आला होता. परंतू या राजकीय तंत्राला न जुमानता व न घाबरता या अधिनियमाचे प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली आहे.
यावेळी बालिकेच्या कुटूंबाचे समुपदेशन करुन बालविवाह प्रतिबंध कायद्याअंतर्गत हमीपत्र लिहून घेण्यात आले. तसेच त्यांना बाल कल्याण समिती, वाशिम यांच्या समक्ष हजर राहण्याचे सांगण्यात आले आहे. यापुढेही अशाप्रकारचे जिल्हयात कोणतेही बालविवाह होत असल्यास चाईल्ड लाईनच्या 1098 या टोल-फ्री क्रमांकावर माहिती देण्याचे आवाहन महिला व बालविकास विभागाने केले आहे.
Post a Comment