Header Ads

११ ऑगस्ट ते १७ ऑगस्ट : हर घर तिरंगा उपक्रम Har Ghar Tiranga



११ ऑगस्ट ते १७  ऑगस्ट : हर घर तिरंगा उपक्रम

भारतीय ध्वज संहितेचे पालन हे प्रत्येकाचे कर्तव्य

    वाशिम, दि. 14 (www.jantaparishad.com) : भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पुर्ण होत आहे. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढयाच्या स्मृती तेवत राहाव्या. या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक स्मरण व्हावे यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 दरम्यान ‘‘हर घर तिरंगा’’ हा उपक्रम जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. प्रत्येक नागरीकांच्या घरावर तसेच शासकीय/निमशासकीय/ खाजगी आस्थापना/सहकारी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर तिरंगा ध्वजाची उभारणी करण्यात येणार आहे. राष्ट्रध्वजाची उभारणी करतांना ध्वज संहितेचे पालन करणे हे प्रत्येक नागरीकाचे कर्तव्य आहे.


         भारतीय नागरीकांच्या आशा आणि आकांक्षांचे भारतीय राष्ट्रध्वज हा प्रतिनिधीत्व करतो. तो आपल्या अभिमानाचं प्रतिक आहे. तिरंगा ध्वजातील केशरी रंग हा स्वार्थनिरपेक्ष त्यागाचा प्रतिक आहे. मध्यभागी असलेला पांढरा रंग प्रकाशाचा, आपल्या आचरणात मार्गदर्शन करणाऱ्या सत्याचा मार्ग आहे. हिरवा रंग हा आपले मातीशी असलेले नाते दर्शवितो. ज्यावर इतर सर्वांचे जीवन अवलंबून आहे. अशा वनस्पती जीवनाशी असलेले आपले नाते दर्शवितो. पाढऱ्या रंगाच्या मध्यभागी असलेले अशोक चक्र हे धर्म नियमांचे चक्र आहे. जे या ध्वजाखाली काम करतात त्यांची सत्य, धर्म किंवा सदाचार ही नियंत्रक तत्वे असली पाहिजेत. तसेच अशोक चक्र हे गतीचे दर्शक आहे. शांततापूर्ण परिवर्तनाच्या गतीशीलतेचे चक्र हे निदर्शक आहे.

        भारतीय ध्वजाची मधली पट्टी ही पांढऱ्या रंगाची आहे. तिच्या मध्यभागी समान अंतराच्या 24 आऱ्यांचे नेव्ही ब्ल्यू रंगाचे अशोक चक्राचे चिन्ह आहे. अशोक चक्र हे विशेषकरुन स्क्रिन प्रिंट केलेले किंवा अन्य प्रकारे प्रिंट केलेले किंवा स्टेन्सिल केलेले अथवा योग्यरीतीने भरतकाम केलेले असावे. ध्वजाच्या दोन्ही बाजूंनी पांढऱ्या पट्टीच्या मध्यभागी पूर्णता दिसेल असे असावे. भारतीय राष्ट्रध्वज हा हाताने कातलेल्या व हाताने विणलेल्या लोकर/सूत/सिल्क/ खादी कापडापासून बनविलेला असावा. ध्वज लावण्याकरीता त्याचा योग्य तो आकार निवडण्यात यावा.


        बोधचिन्हे व नावे अधिनियम,1950 आणि राष्ट्र प्रतिष्ठा अपमान प्रतिबंध अधिनियम 1971 आणि या विषयावर अधिनियमित केलेला इतर कोणताही कायदा यात तरतूद केलेल्या मर्यादांव्यतिरिक्त सर्वसाधारण जनतेतील कोणत्याही व्यक्ती, खाजगी संघटना, शैक्षणिक संस्था ईत्यादींना राष्ट्रध्वज लावण्यावर कोणतेही निर्बंध नाही. अधिनियमाचा भंग करुन वाणिज्यिक प्रयोजनासाठी राष्ट्रध्वजाचा वापर करता येणार नाही. कोणत्याही व्यक्तीस किंवा वस्तूस मानवंदना देण्यासाठी राष्ट्रध्वज खाली आणता येणार नाही.


      शासनाने दिलेल्या निर्देशानुसार सरकारी इमारतीवरील राष्ट्रध्वज प्रसंगाशिवाय अर्ध्यावर उतरविण्यात येणार नाही. खाजगी अंत्यसंस्कारासह अशा कोणत्याही स्वरुपातील आच्छादन म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करता येणार नाही. ध्वजाचा कोणत्याही प्रकारच्या पोशाखाचा किंवा गणवेशाचा भाग म्हणून वापरता येणार नाही. त्याचे उशा, हातरुमाल, हात पुसणे किंवा कोणत्याही पोषाख साहित्यावर भरतकाम किंवा छपाई करता येणार नाही. त्यावर कोणत्याही प्रकारचे अक्षरे लिहिता येणार नाही. ध्वजाचा कोणतेही वस्तू घेण्याचे, देण्याचे, बांधण्याचे किंवा वाहून नेण्याचे साधन म्हणून वापर करता येणार नाही. ध्वज व्यक्त्याचा टेबल झाकणे किंवा व्यासपीठावर आच्छादन म्हणून वापरता येणार नाही.


      राष्ट्रध्वजाचा जाणीपूर्वक भूमीशी किंवा जमीनीशी स्पर्श होवू देवू नये. पाण्यावरुन तो फरफटत नेऊ नये. मोटार वाहन, रेल्वे गाडी, जहाज किंवा विमान यांच्या झडपावर, छतावर, बाजूंवर किंवा पाठीमागच्या बाजूस आच्छादता येणार नाही. इमारतीसाठी आच्छादन म्हणून राष्ट्रध्वजाचा वापर करता येणार नाही. कोणतीही व्यक्ती, खाजगी संघटना किंवा शैक्षणिक संस्था यांना राष्ट्रध्वजाची प्रतिष्ठा व सन्मान राखून सर्व प्रसंगाच्या व समारंभाच्या दिवशी किंवा अन्यथा ध्वजरोहन करता येईल तसेच राष्ट्रध्वज लावता येईल. ज्या -ज्या ठिकाणी राष्ट्रध्वज लावण्यात येईल अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून व तो स्पष्टपणे दिसेल अशा पध्दतीने लावावा.

       फाटलेला किंवा चुरगळलेला राष्ट्रध्वज लावण्यात येवू नये. अन्य कोणत्याही ध्वजासोबत किंवा ध्वजांसोबत एकाच वेळी एकाच काठीवर फडकवू नये.संहितेत केलेल्या तरतूदी व्यक्तीरिक्त कोणत्याही वाहनावर राष्ट्रध्वज लावण्यात येवू नये. राष्ट्रध्वजाच्या बरोबरीने कोणताही ध्वज किंवा पताका लावू नये. ध्वजाचा पताका, तोरण किंवा गुच्छ म्हणून कोणत्याही प्रकारे शोभेसाठी उपयोग करु नये.राष्ट्रध्वज सुर्योदयापासून सुर्यास्तापर्यत लावण्यात यावा. ध्वजाविषयी आदरभावना वृध्दींगत करण्याच्या उद्देशाने राष्ट्रध्वज शैक्षणिक संस्थामध्ये लावता येईल. मुख्याध्यापक, विद्यार्थी नेता आणि ध्वज फडकविणारी व्यक्ती ध्वजस्तंभाच्या मागे तीन पावले उभे राहावे. ज्या ठिकाणी ध्वज लावण्यात येईल, अशा प्रत्येक ठिकाणी त्याची प्रतिष्ठा राखून तो स्पष्टपणे दिसेल अशाप्रकारे लावला पाहिजे. येत्या 11 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “हर घर तिरंगा ” या उपक्रमात प्रत्येक नागरीकाच्या घरावर, सर्व शासकीय/निमशासकीय/ खाजगी आस्थापना/ सहकारी संस्था व शैक्षणिक संस्थांच्या इमारतीवर राष्ट्रध्वज उभारतांना प्रत्येक नागरीकाने भारतीय ध्वज संहितेचे पालन करावे. असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

No comments

Powered by Blogger.