स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामाप्र आरक्षणासाठी नागरिकांची मते जाणून घेण्यासाठी
28 मे रोजी समर्पित आयोगाची अमरावती येथे भेटीचा कार्यक्रम
वाशिम, दि. 13 (जिमाका) : जिल्हा परिषद, पंचायत समित्या, ग्राम पंचायती आणि शहरातील नगर पालिका आणि नगर पंचायती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नागरिकांच्या मागास प्रवर्गास (ओबीसी. व्हिजेएनटी) आरक्षण देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे राज्य शासनाने समर्पित आयोग गठीत केला आहे. राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नागरिकांच्या मागास प्रवर्गातील आरक्षणासाठी जनतेची मते जाणून घेण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विविध सामाजिक संघटना यांची निवेदने स्वीकारण्यासाठी या समर्पित आयोगाने विभागवार कार्यक्रम जाहिर केला आहे.
येत्या 28 मे रोजी विभागीय आयुक्त कार्यालय, अमरावती येथे समर्पित आयोगाच्या भेटीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या समर्पित आयोगाच्या भेटीच्या वेळी आपले मते नागरिकांना वेळेत मांडता यावीत आणि निवेदन देता यावीत यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयात व जिल्हाधिकारी कार्यालय, वाशिम (ग्रामपंचायत निवडणूक शाखा) यांचेकडे आपल्या नावाची नोंदणी भेटीच्या दिनांकापूर्वी सायंकाळी 6 वाजेपर्यंत करावी. असे आयोगातर्फे निवेदन करण्यात आले आहे. नाव नोंदणी करतांना व्यक्तीचे संस्थेचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक व असल्यास ई-मेल इत्यादी बाबी नोंदणीदरम्यान द्याव्यात. यासाठी संबंधित विभागीय आयुक्त कार्यालयाशी संपर्क करावा. असे निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम यांनी कळविले आहे.
0 comments:
एक टिप्पणी भेजें