विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान सादर करण्याचे आवाहन - Beneficiaries of Special Assistance Scheme
विशेष सहाय्य योजनेच्या लाभार्थ्यांनी हयात प्रमाणपत्र 1 जानेवारी ते 31 मार्च दरम्यान सादर करण्याचे आवाहन
वाशिम, दि. 22 (जिमाका) : निराधार, अंध, अपंग, शारीरीक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती व निराधार विधवा, परीतक्त्या, देवदासी या सर्व दुर्बल घटकांसाठी अर्थसहाय्य देण्याच्या हेतूने शासनाकडून राज्य व केंद्रपुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दपकाळ निवृत्तीवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तीवेतन योजनेचे व इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तीवेतन योजना राबविण्यात येतात.
या सर्व योजनांसाठी अर्थसहाय वितरण व सनियंत्रण पध्दतीबाबत कार्यपध्दती निश्चित केली आहे. लाभार्थी हयात असल्याबाबतची तपासणी वर्षातून एकदा करण्याचे शासनाचे निर्देश आहे. त्यानुसार दरवर्षी ०१ जानेवारी ते ३१ मार्च या कालावधीत एकदा संबधीत लाभार्थ्यांनी त्यांचे जिथे खाते आहे. अशा बँकेमध्ये स्वत: हजर राहून हयात असल्याबाबतची नोंद संबंधित बँकेनी घ्यावी.
जिल्हयातील सर्व राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँका, अर्बन बँक व मल्टीशेडयुल बँक यांना विशेष सहाय्य योजनेअंतर्गत असलेल्या लाभार्थी/ खातेदार यांचेकडून सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात हयात असल्याबाबतचे प्रमाणपत्र माहे ०१ जानेवारी २०२२ ते ३१ मार्च २०२२ या कालावधीत घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहे. या कालावधीनंतर हयाती प्रमाणपत्र सादर न केलेल्या कोणत्याही लाभार्थ्यास विशेष सहाय्य योजनेअंतर्गत खात्यामधून अनुदान वितरीत करण्यात येणार नाही. लाभार्थ्यांकडून हयातीबाबत घेतलेले प्रमाणपत्र संकलित करून त्या संबंधित तालुक्याच्या तहसिलदारांकडे पाठविण्याबाबत यावे. हयाती प्रमाणपत्र सादर न केलेल्या लाभार्थ्यास १ एप्रिल २०२२ पासुन अनुदान वितरीत करण्यात येवू नये. अनुदान वितरीत केल्यास भविष्यात याबाबत अनियमितता झाल्यास संबधित बँकेस दोषी ठरविण्यात येईल. असे जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी कळविले आहे.
Post a Comment