Header Ads

पत्रव्यवहार व कामकाजात मराठीचा वापर अनिवार्य - Mandatory use of Marathi in correspondence and work



पत्रव्यवहार व कामकाजात मराठीचा वापर अनिवार्य

मराठी भाषा समितीची सभा संपन्न

वाशिम, दि. 18 (www.jantaparishad.com) : सर्वसामान्य जनतेशी करण्यात येणारा सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज राज्य शासनाच्या सर्व कार्यालयांना मराठी भाषेत करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र राजभाषा (सुधारणा) अनिनियम 2021 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हास्तरीय मराठी भाषा समितीची सभा समितीचे सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली. समितीचे अशासकीय सदस्य मोहन शिरसाट व दिपक ढोले यांचेसह काही शासकीय सदस्यांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

मराठी या राजभाषेची प्रभावी अंमलबजावणी करण्याकरीता जिल्हयातील सर्व कार्यालयाकडून 6 नोव्हेंबर 2021 च्या शासन निर्णयानुसार परिशिष्ट-अ नुसार स्वयंघोषणापत्र तसेच मराठी भाषेच्या वापराबाबत त्रैमासिक अहवाल मागविण्याच्या सुचना देण्यात आल्या. त्रिभाषा सुत्रानुसार कार्यालयातील नावांच्या पाटया, सुचना फलक, जाहिराती तसेच कार्यालयीन शिक्के, जिल्हास्तरीय संकेतस्थळे इत्यादीमध्ये मराठी भाषा वापरणे बंधनकारक आहे. जिल्हा व तालुका स्तरावर मराठी भाषेसंदर्भात समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्याची माहिती यावेळी दिली. त्रिभाषा सुत्रानुसार जिल्हयातील केंद्र शासनाची कार्यालये, बँका, दूरसंचार विभाग, टपाल विभाग, विमा कार्यालये, रेल्वे, गॅस, पेट्रोलियम इ. सेवा पुरविणारी अन्य कार्यालये यांनी मराठी भाषेचा वार करण्याबाबत सुचना करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. तसेच बँकांच्या सर्व ठिकाणच्या एटीएम मशीनमध्ये मराठी भाषेचा पर्याय, बँकेमध्ये ग्राहकांसाठी असलेले विविध पावत्या व अर्ज मराठी भाषेत उपलब्ध करुन देण्याबबात जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना कळविण्यात येणार असल्याचे श्री. हिंगे यांनी सांगितले.

कार्यालयामध्ये देण्यात येणाऱ्या सुचना तसेच दिशादर्शक फलक, आगमन व निर्गमन निर्देश फलक, वेळापत्रक, नामफलक, आरक्षण नमुने इत्यादीमध्ये मराठी भाषेचा वापर प्राधान्याने करण्याच्या हॉटेल, कोचिंग क्लासेस, इंग्रजी शाळा व इतर खाजगी ठिकाणी मराठी भाषेचे फलक तसेच मराठी भाषेच्या वापराबाबत नगर परिषद क्षेत्रामध्ये आणि ग्रामीण भागामध्ये गट विकास अधिकारी यांना सुचना करयाबाबत समितीच्या सदस्यांनी यावेळी सुचविले. 

No comments

Powered by Blogger.