Header Ads

१५ ते २५ नोव्हेंबर २०२१ - प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम : Direct TB research campaign

 



१५ ते २५ नोव्हेंबर २०२१ - प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम

 38 हजार कुटुंब भेटीतून रुग्ण शोधणार - सहकार्य करण्याचे आवाहन

    वाशिम दि.12 (जिमाका) - जिल्ह्यात क्षयरोगाचे निदान होण्यापासून वंचित असणाऱ्या जोखमीच्या ठिकाणी 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यान गृहभेटी देऊन क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींचा शोध घेण्यात येणार आहे. या भेटीदरम्यान क्षयरोगाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची थुंकी नमुने तपासण्यात येणार आहे.आवश्यकता असल्यास एक्स-रे व इतर तपासण्या करण्यात येणार आहेत.क्षयरोगाचे निदान झालेल्या रुग्णांवर औषधोपचार करण्यात येणार आहे. 

     क्षयरुग्णांचा प्रत्यक्ष शोध घेताना शहरी भागातील झोपडपट्ट्या ग्रामीण व आदिवासी भागात पोहोचविण्यासाठी अवघड असलेली गावे आणि वस्त्या, खाणीतील कामगार आणि ज्या गावांमध्ये रुग्ण जास्त असू शकतात अशी गावे, वृद्धाश्रम, दगड फोडणारे कामगार, आदिवासी शाळा, वसतिगृहे, बांधकाम स्थळांच्या ठिकाणी काम करणारे लोक, समुदायातील अतिकुपोषित व कुपोषित भाग म्हणून ओळख असलेल्या असलेला आदिवासी भाग, निर्वासितांच्या छावण्या व जिथे गावकरी पारंपारिक पद्धतीने उपचार शोधत असतात  अशी ठिकाणे, निवडलेला एच.आय.व्ही अतिजोखिमचा गट,बेघर, विणकाम औद्योगिक कामगार, आदिवासी भागातील कमी हवेशीर असलेल्या आदिवासी झोपड्या, रस्त्यावरची मुले, अनाथालये, असंघटित कामगार, निराधार असलेली घरे आणि पारंपारिक पद्धतीने उपचार घेत असलेल्या गावातील वंचित घटकातील क्षयरोगाची लक्षणे असलेल्या व्यक्तींचा शोध या मोहिमेअंतर्गत घेण्यात येणार आहे.    

       जिल्ह्यातील प्रत्यक्ष रुग्णांचा शोध घेण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. शहरी भागातील 62 हजार 983 आणि ग्रामीण भागातील एक लाख 28 हजार 338 अशा एकूण 1 लाख 91 हजार 321 व्यक्तींची तपासणी करण्यासाठी 38 हजार 264 घरांना आरोग्य विभागाच्या 250  चमू भेट देणार आहे. या कामाच्या पर्यवेक्षणासाठी 57 पर्यवेक्षक नियुक्त केले आहे.

       प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहीम 15 ते 25 ऑक्टोबरदरम्यान पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा धर्तीवर राबविण्यात येणार आहे.या मोहीमेदरम्यान ग्रामीण भागात एक चमू 40 घरांची तर शहरी भागात एक चमू 50 घरांचे सर्वेक्षण करणार आहे. सर्वेक्षण करणारी चमू गृहभेटी देऊन कुटुंब प्रमुख आणि कुटुंबातील सदस्यांची प्रत्यक्ष तपासणी करणार आहे.

          दोन आठवड्यांपेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यांपेक्षा जास्त ताप असणे, मागील तीन महिन्यांमध्ये वजनात लक्षणीय घट असणे, मागील सहा महिन्याच्या कालावधीत कधीही थुंकीवाटे रक्त पडत असणे,मागील एका महिन्यापासून छातीत दुखणे, तसेच पूर्वी क्षयरोग रोगाचे उपचार घेतलेल्या व्यक्ती ह्या रोगाचे संशयित रुग्ण असू शकतात.तेव्हा 15 ते 25 नोव्हेंबर दरम्यानच्या प्रत्यक्ष क्षयरुग्ण शोध मोहिमेला नागरिकांनी सहकार्य करून आपली तपासणी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील निकम यांनी केले आहे.

No comments

Powered by Blogger.