Header Ads

पात्र व्यक्तींनी लस घ्यावी अन्यथा प्रतिबंधाची शक्यता - Eligible persons should be vaccinated otherwise there is a possibility of prevention



पात्र व्यक्तींनी लस घ्यावी अन्यथा प्रतिबंधाची शक्यता

वाशिम, दि. 14 (जिमाका) : कोरोना ही या शतकातील जागतिक महामारी. कोरोना विषाणूचा संसर्ग सन 2020 मध्ये जगभर पसरण्यास सुरुवात झाली. मार्च 2020 मध्ये कोरोनाने भारतात प्रवेश केला. जगातील अनेक देश या महामारीच्या संकटात सापडले. मोठ्या प्रमाणात प्राणहानी झाली. अनेकांना आपली आप्तस्वकीय गमावण्याची वेळ आली. जगातील अनेक देशातील वैद्यकीय क्षेत्रातील संशोधकांच्या अथक परीश्रमातून कोरोनाला प्रतिबंध करणारी लस तयार करण्यात आली.

कोरोना संसर्गाच्या आतापर्यत दोन लाटा येवून गेल्यात. देशात विशेषत: राज्यात पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात कोरोना संसर्गामुळे अनेकांचे प्राण गेले. काही बालकांचे आई तर काही बालकांचे वडिल तर काहीचे दोन्ही पालक गेल्याने बालके निराधार झाली. निराधार झालेल्या बालकांना बालसंगोपन योजनेतून लाभ देण्यासाठी सरकारने पुढाकार घेतला.

पहिल्या लाटेत व दुसऱ्या लाटेत कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाऊन करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संशोधकांनी तयार केलेली लस पात्र व्यक्तींना देण्यास 16 जानेवारीपासून सुरुवात झाली. कोरोनाला प्रतिबंध म्हणून कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सीन ह्या दोन लसी पात्र व्यक्तींना देण्यात येत आहे. कोणत्याही एका लसीचे एका ठराविक कालावधीत दोन डोस घेणे आवश्यक आहे. कोविशिल्डचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 84 दिवसानंतर तर कोव्हॅक्सीनचा पहिला डोस घेतल्यानंतर दुसरा डोस 28 दिवसानंतर घेणे आवश्यक आहे.

कोरोना संसर्ग काळात कोरोना प्रतिबंधक लस आली पाहिजे, हे प्रत्ये‍क व्यक्तीला वाटत होते. संशोधनातून लस उपलब्ध झाल्यानंतर अनेक पात्र व्यक्तींनी ती घेतली आहे. पूर्वी या लसीबाबत देखील गैरसमज पसविण्यात आले. आरोग्य विभाग आणि विविध यंत्रणांच्या माध्यमातून या लसीबाबत असलेले गैरसमज दूर करण्यात आले. आजही अनेक पात्र व्यक्तींनी ही लस घेतलेली नाही. ज्या व्यक्ती कोरोना संसर्गाच्या आजारातून ठिक झाल्या आहेत. त्यांनी प्राधान्याने स्वत:चे लसीकरण करुन घेतले आहे. मात्र ज्यांना कोरोनाचा संसर्ग झाला नाही. त्यांना मात्र या लसीचे महत्व वाटत नसल्याचे चित्र आहे.

कोरोना संसर्गांची संभाव्य तिसरी लाट आपल्याला थांबवायची असेल तर प्रत्येक पात्र व्यक्तींनी कोरोनाची लस घेणे आवश्यक आहे. पात्र व्यक्तींनी लस घ्यावी, यासाठी शासनाने विविध माध्यमांचा वापर करुन कोरोना लसीकरणाबाबत जनजागृती केली. अनेकांनी जनजागृतीतून लसीकरणाचे महत्व जाणून घेवून लसीकरण करुन घेतले. परतू आजही लसीकरणासाठी पात्र असलेला मोठा वर्ग लसीकरणापासून दूर असल्याचे चित्र आहे. शासन विविध स्तरावर कोरोना लसीकरण मोहिम राबवित आहे. आज लस मोठ्या प्रमाणात लसीकरण केंद्रावर उपलब्ध असतांना पात्र नागरीक लस घेण्यास टाळाटाळ करीत आहे. ज्यांचे लसीकरण बाकी आहे त्यांनी थोडाही विलंब न करता कोविड लस घ्यावी. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट केव्हा येईल हे निश्चित सांगता येत नाही. कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोरोना प्रतिबंधक लस घेणे हाच त्यावरचा रामबाण इलाज आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली असल्याबाबतचे प्रमाणपत्र असल्यावरच संबंधित प्रवाशाला विमान प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. भविष्यात मंदिरात दर्शनासाठी, विविध शासकीय व खाजगी कार्यालयांमध्ये कामानिमित्त तसेच विविध आस्थापनांमध्ये ग्राहक म्हणून वस्तू व साहित्य खरेदी करण्यासाठी जावयाचे असल्यास कोविड लसीचे दोन्ही डोस घेतल्याशिवाय प्रवेश करता येणार नाही. असे प्रतिबंध देखील भविष्यात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कोणत्याही पात्र व्यक्तींनी कोरोना गेला आहे हे गैरसमज करुन न घेता आपल्या जवळच्या लसीकरण केंद्रावर जावून कोरोना प्रतिबंध लस घ्यावी व भविष्यात येणाऱ्या संभाव्य तिसऱ्या लाटेपासून स्वत:चा बचाव करावा. यातच आपले आरोग्यहित आहे.

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.