Header Ads

प्रधानमंत्री मातृ वंदन योजना - वाशिम जिल्ह्यातील २६ हजार महिलांना मिळाला लाभ - pradhanmantri matru vandan yojana washim district

pradhanmantri matru vandan yojana washim district


वाशिम जिल्ह्यातील २६ हजार महिलांना मिळाला प्रधानमंत्री मातृ वंदन योजना चा लाभ

१ ते ७ सप्टेंबर प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह

वाशिम, दि. ०३ (जिमाका) : दारिद्र्य रेषेखालील आणि दारिद्र्य रेषेवरील सर्वच स्तरातील गर्भवती महिलांना गरोदरपणाच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत मजुरीसाठी काम करावे लागल्यास अशा गर्भवती महिला व माता कुपोषीत राहून त्यांच्या व त्यांच्या नवजात बालकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. या माता व बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने गर्भवती महिला व स्तनदा महिलेला सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करण्यासाठी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचेही आरोग्य चांगले राहावे, यासाठी केंद्र सरकारने १ जानेवारी २०१७ पासून संपूर्ण देशभर प्रधानमंत्री मातृ वंदना येाजना (pradhanmantri matru vandan yojana) सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात (washim district) आतापर्यंत २६ हजार ७८७ पात्र महिलांना १० कोटी ५७ लक्ष ४६ हजार रुपयांचा लाभ देण्यात आला आहे. जिल्ह्याच्या उद्दिष्टानुसार ९१ टक्के महिलांना लाभ मिळाला आहे.

जिल्ह्यात १ ते ७ सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रधानमंत्री मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. १ सप्टेंबर रोजी या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. श्रीमती देशमुख, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. मंजुश्री जांभरुणकर यांनी हिरवी झेंडी दाखवून सप्ताहाला सुरुवात केली. यावेळी डॉ. जांभरुणकर व जिल्हा कार्यक्रम समन्वयक श्रीमती राखी पिंपरकर यांनी गरोदर मातेने घ्यायची काळजी, आहार आणि कोविड लसीकरण याबाबत मार्गदर्शन केले.

प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेचा लाभ शासकीय सेवेत असणाऱ्या माता वगळता इतर सर्व मातांना पहिल्या अपत्यासाठी तीन टप्प्यात पाच हजार रुपये देण्यात येतो. जिल्हयातील विविध स्तरातील लाभार्थ्यांना लाभ मिळण्याच्या दृष्टीने या सप्ताहादरम्यान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्षेत्रातील आशा वर्कर, अंगणवाडी सेविका किंवा कोणत्याही जवळच्या शासकीय दवाखाना, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, जिल्हा शासकीय सामान्य रुग्णालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

योजनेअंतर्गत पहिला हप्ता १ हजार रुपये मिळण्यासाठी लाभार्थी महिलेने गरोदरपणाची नोंद आर.सी.एच. पोर्टलमध्ये ए.एन.एम. यांच्याकडे मासिक पाळी चुकल्यानंतर १५० दिवसाच्या आत करणे आवश्यक आहे. २ हजार रुपयांचा दुसरा हप्ता मिळण्यासाठी गरोदरपणाची ६ महिन्यात (१८० दिवस) किमान एक प्रसुतीपूर्व तपासणी होणे आवश्यक आहे. तिसरा हप्ता २ हजार रुपये मिळण्यासाठी प्रसुतीनंतर बाळाच्या जन्माची नोंद बीसीजी, ओपीव्ही (झिरो डोस) याची एक मात्रा तसेच पेंटाव्हॅलेंट, ओपीव्ही लसीच्या तीन मात्रा घेणे आवश्यक आहे.

मातृ वंदना योजनेचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थी महिला व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधार संलग्न बँक खाते, गरोदरपणाची शासकीय आरोग्य संस्थेत गरोदर दरम्यान तपासणी, बाळाचा जन्म नोंदणी दाखला व प्राथमिक लसीकरण करणे आवश्यक आहे. या व्यतिरिक्त जननी सुरक्षा योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालयात बाळंतपण झाले असल्यास मिळणारे आर्थिक सहाय्य देखिल देय आहे. लाभार्थ्याला वरील अटींची पुर्तता केल्यानंतर ३० दिवसाच्या आत लाभाची रक्कम देण्यात येते. वरील योजनेची माहिती व लाभ घेण्यासाठी आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, आरोग्य उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी केले आहे.  

No comments

Powered by Blogger.