करडई पेरणीस इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन - Farmers interested in safflower sowing are urged to apply online
करडई पेरणीस इच्छुक शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
- जिल्ह्यात तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्प राबविणार
- प्रति एकर ३ हजार रुपये ‘डीबीटी’द्वारे लाभ मिळणार
- उत्पादित करडई शासकीय हमी भावाने खरेदीची हमी
वाशिम (www.jantaparishad.com) दि. १७ : तेलबिया उत्पादन, प्रक्रिया व विक्री प्रकल्प अंतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), डॉ. पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठ आणि वाशिम कृषि विभाग यांच्या समन्वयाने आगामी रब्बी हंगामात क्लस्टर निवड करून वाशिम जिल्ह्यात करडईचा पेरा किमान ५००० एकरपर्यंत करण्याचे नियोजित आहे. करडई लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना निविष्ठा स्वरुपात प्रति एकर ३ हजार रुपयांचा लाभ ‘डीबीटी’द्वारे दिला जाणार आहे. तरी करडई पेरणी करू इच्छिणाऱ्या जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांनी ‘महाज्योती’ mahajyoti च्या https://mahajyoti.org.in/en/notice-board/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक शंकर तोटावार यांनी केले आहे.
इतर मागास प्रवर्ग (ओबीसी), विशेष मागास प्रवर्ग (एसबीसी), भटक्या व विमुक्त जमाती (व्हीजेएनटी) प्रवर्गातील शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी होता येणार असून त्यांचे नावे जमीन असावी. आधारकार्ड, जातीचे प्रमाणपत्र, क्रिमीलेअर प्रमाणपत्र आदी कागदपत्रे आवश्यक आहेत. तसेच अर्जदार शेतकरी हा आत्मा गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीचा सदस्य असावा. अर्जदार शेतकऱ्याने किमान एक एकर क्षेत्रावर पेरणी करणे आवश्यक आहे, कमाल मर्यादा नाही.
योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या शेतकऱ्यांना ३ हजार रुपये प्रति एकर निविष्ठा मिळणार आहे. तसेच उत्पादित झालेली करडई शासकीय हमी भाव ५ हजार ३५० रुपये प्रमाणे महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था अंतर्गत खरेदी करण्याची हमी राहील. करडईवर प्रक्रिया करून तेल विक्रीतून होणारा नफा प्रमाणात लाभांश डीबीटीद्वारे दिला जाईल. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी संबंधित तालुक्याचे ‘आत्मा’चे बीटीएम किंवा प्रकल्प समन्वयक मनीष बोरकर ( भ्रमणध्वनी क्र. ९१५८९१ ४६४८) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन श्री. तोटावार यांनी केले आहे.
Post a Comment