वाशिम जिल्हयात 12 ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू - prohibition order in washim district till 12 october
वाशिम जिल्हयात 12 ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू
वाशिम (www.jantaparishad.com) दि. 28 (जिमाका) : जिल्हयात 28 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर 2021 या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधीत राहण्याच्या दृष्टीने मुंबई पोलीसांची कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी लागू केले आहे. जिल्हयात येत्या 5 ऑक्टोबर रोजी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची पोट निवडणूक होत आहे. या निवडणूकीची मतमोजणी 6 ऑक्टोबर रोजी होणार आहे. 7 ऑक्टोबरपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात होत आहे. जिल्हयात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असल्याने कोविड-19 प्रतिबंधात्मक निर्देशाचे पालन करण्याची निरंतर कार्यवाही करण्यात येत आहे. नोकरीमध्ये पदोन्नतीत मागासवर्गीयांना 33 टक्के आरक्षण कायम ठेवावे, या मागणीसाठी विविध कर्मचारी संघटनाकडून विविध प्रकारच्या आंदोलनांचे आयोजन करण्यात येत आहे. केंद्र सरकारने मंजूर केलेले कृषी विधेयक, शेतकरी कर्जमाफी, पीक कर्ज मंजूरी, दुध दरवाढ, वाढती महागाई, विज बिल माफी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई तसेच इतर विविध मागण्या संदर्भात विरोधी पक्ष तसेच शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलनात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वाशिम जिल्हा हा जातीयदृष्टया आणि सण उत्सवाचे दृष्टीने अत्यंत संवेदनशील आहे. जिल्हयात मागील काही काळात घडलेल्या जातीय घटनांच्या प्रतिक्रीया आगामी सण-उत्सवाच्या काळात उमटण्याची शक्यता नाकारता येत नाही. यादरम्यान जिल्हयात कायदा व सुव्यवस्था राखणे सुलभ व्हावे यासाठी 28 सप्टेंबर 2021 रोजीचे 00.01 वाजेपासून ते 12 ऑक्टोबर 2021 रोजीच 24.00 वाजेपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हादंडाधिकारी, वाशिम यांनीनिर्गमित केले आहे.
तसेच मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (3) अन्वये सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींच्या जमावास एकत्र जमण्यास किंवा मिरवणुकीस मनाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी कार्यालयाच्या 13 ऑगस्ट 2021 रोजीच्या आदेशाने वाशिम जिल्ह्यामध्ये कोविड-19 प्रतिबंधक उपाययोजनांच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या बाबींचे पालन करून कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी किंवा इतर शासकीय, निमशासकीय कर्मचारी किंवा विवाह, अंत्ययात्रा, तसेच सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकीस व कार्यक्रमास हे आदेश लागू राहणार नाही.
पोलीस स्टेशनचे अधिकारी यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात परिस्थितीनुरूप योग्य कारण असेल व तसे करण्याशिवाय पर्याय नसेल तर अशा परिस्थितीत याबाबत कोणताही आदेश नजीकच्या उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी विचार विनिमय करून आदेश लागू करण्यास उपविभागीय दंडाधिकारी यांना प्राधिकृत करण्यात येत आहे, तसेच आवश्यकता वाटल्यास उपविभागीय दंडाधिकारी यांनी संवेदनशील ठिकाणी विशेष कार्यकारी अधिकारी, दंडाधिकारी यांच्या नेमणुका कराव्यात, असे जिल्हादंडाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी या प्रतिबंधात्मक आदेशात म्हटले आहे.
Post a Comment