Header Ads

अनाथ बालकांसाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाचा विस्तार - Expansion of District Level Action Force for Orphans

Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakur

अनाथ बालकांसाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाचा विस्तार

कोविडमुळे एकल, विधवा झालेल्या महिलांच्या पुनर्वसनाच्याही उपाययोजना

मुंबई, दि. 9: कोविड प्रार्दुभावामुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या पुनर्वसनासाठी स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाच्या (टास्क फोर्स) व्याप्तीमध्ये वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून यामध्ये कोविडमुळे एकल /विधवा झालेल्या महिलांचे योग्य पुनर्वसन करण्याच्या व त्यांचे न्याय्य हक्क अबाधित राखण्याच्या अनुषंगाने उपाययोजना करण्याबाबतचा समावेश करण्यात आला आहे. महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर (Minister for Women and Child Development Adv. Yashomati Thakur) यांनी गेल्याच आठवड्यात (दि.5 ऑगस्ट) याबाबत केलेल्या घोषणेच्या अनुषंगाने आज तातडीने शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या बाल न्याय समितीच्या निर्देशानुसार राज्य शासनाने कोविड- 19 प्रादुर्भावाच्या काळात राज्यातील बालकांची काळजी व संरक्षणाचे काम करणाऱ्या संस्थांमधील बालकांना तसेच कोविड 19 मुळे दोन्ही पालक गमावलेल्या बालकांसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली कृती दल (टास्क फोर्स) गठित करण्यात आला आहे. जिल्हा स्तरावरील या टास्क फोर्समार्फत या बालकांचे न्याय्य हक्क मिळवून देवून त्यांचे योग्य संगोपन होण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत.

कोविड- 19 मुळे कुटुंब प्रमुखाचा मृत्यु होऊन अनेक महिला एकल / विधवा झालेल्या आहेत. कोविड प्रार्दुभावामुळे या महिलांचे योग्य पुनर्वसन करून त्यांना समाजामध्ये पुनर्स्थापित करणे आवश्यक असल्याने बालकांच्या पुनर्वसनासंदर्भात स्थापित जिल्हास्तरीय कृती दलाची व्याप्ती वाढवण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे. त्यामध्ये सदस्य म्हणून सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभाग, जिल्हा समन्वयक, महिला आर्थिक विकास महामंडळ, सहायक आयुक्त, समाज कल्याण विभाग तसेच सहायक समन्वयक म्हणून जिल्हा कार्यक्रम अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी-नोडल अधिकारी), एकात्मिक बाल विकास सेवा योजना या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे.

कोविड प्रादुर्भावामुळे एकल /विधवा झालेल्या महिलांना शासनाच्या विविध विभागांच्या योजनांचा लाभ देण्यात येवून त्यांचे पुनर्वसन करणे व त्यांचे मालमत्ता विषयक अधिकार अबाधित राखण्याच्या अनुषंगाने आवश्यक उपाययोजना कृती दलामार्फत करण्यात येणार आहेत. तसेच कोविड प्रार्दुभावामुळे एकल /विधवा झालेल्या महिला कौटुंबिक हिंसाचारास बळी पडण्याची शक्यता असल्याने त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश या कृती दलास देण्यात आले आहेत.

कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विभागामार्फत या महिलांची नोंदणी करून त्यांचे कौशल्य, शिक्षण व आवड लक्षात घेवून त्यांना आवश्यकतेप्रमाणे प्रशिक्षण देवून त्यांना रोजगार मिळवून देण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाकडून या महिलांचे बचत गट स्थापन करून बचत गटांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्राधान्याने लाभ देण्यात यावा. तसेच या बचत गटांना महिला आर्थिक विकास महामंडळामार्फत कमी व्याज दरात भाग भांडवल उपलब्ध करून देण्यात यावे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांचा लाभ या महिलांना प्राधान्याने देण्यात यावा अशा उपाययोजना या कृती दलाअंतर्गत राबवण्यात याव्यात असे शासन निर्णयात नमूद आहे.

अंगणवाडी सेविकांना या महिलांची माहिती प्राप्त करून घेवून ही माहिती जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी व कृती दलास उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी / बाल विकास प्रकल्प अधिकारी (नागरी-नोडल अधिकारी) यांच्यावर सोपवण्यात आली आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

“कोविड-19 मुळे घरातील कमावता पुरुष गेल्यामुळे एकल, विधवा झालेल्या महिलांचे प्रश्न गंभीर झालेले आहेत. राज्य शासन या महिलांच्या पुनर्वसनासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यास बांधिल आहे. तथापि, या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थाही पुढाकार घेत आहेत ही चांगली बाब आहे. गेल्याच आठवड्यात एकल महिला पुनर्वसन समितीबरोबर राज्यातील महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांसोबत बैठक घेतली होती. त्यानुसार उपाययोजनांची रुपरेषा निश्चित करण्यात येत असून लवकरच त्याचे दृश्य परिणाम दिसतील.”

– ॲड. यशोमती ठाकूर, महिला व बालविकास मंत्री

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.