Header Ads

वाशिम जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली जारी - DM order washim district new rules from tomorrow



वाशिम जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली जारी

  • सोमवार ते शुक्रवार दरम्यान दुकाने रात्री ८ वाजेपर्यंत सुरु राहणार
  • गर्दी होणाऱ्या कार्यक्रम, समारंभावर निर्बंध कायम
  • सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे पुढील आदेशापर्यंत बंद

वाशिम (www.jantaparishad.com) दि. ०३ (जिमाका) - जिल्ह्यात ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अत्यावश्यक व अत्यावश्यक सेवा व्यतिरिक्त दुकाने, मॉल सोमवार ते शुक्रवार दरम्यान रात्री ८ वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. रविवारी केवळ अत्यावश्यक सेवेची दुकाने सुरु राहतील. याबाबतचे आदेश जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी आज, ३ ऑगस्ट रोजी जारी केले असून हे आदेश ३ ऑगस्ट रोजीच्या मध्यरात्रीपासून ते पुढील आदेशापर्यंत कायम राहणार आहेत.

या आदेशानुसार सर्व प्रकारची खेळाची मैदाने व उद्याने चालणे, धावणे, सायकलिंग, व्यायाम इत्यादी खेळांसाठी खुली राहतील. सर्व शासकीय व खासगी कार्यालये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील. ज्या कार्यालयात शक्य असेल अशा ठिकाणी वर्क फ्रॉम होम पद्धतीचा अवलंब करण्यास मुभा राहील. सर्व प्रकारची शेतीविषयक कामे, बांधकामे, उद्योग, वस्तूंची वाहतूक इत्यादी बाबी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित राहतील.

जीम, व्यायामशाळा, योगा केंद्र, ब्युटीपार्लर्स, केशकर्तनालये, ही ५० टक्के क्षमतेने विना वातानुकूलन पद्धतीने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत, शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहतील व रविवारी पूर्णपणे बंद राहतील. सर्व प्रकारची उपहारगृहे ५० टक्के आसन क्षमतेने सोमवार ते शुक्रवार रात्री ८ वाजेपर्यंत व शनिवारी दुपारी ३ वाजेपर्यंत सुरु राहतील. उपहारगृहामध्ये टेकअवे आणि पार्सल सुविधा पूर्वीप्रमाणे सुरु राहील. उपहारगृह मालकांना कोविड-१९ च्या सर्व सुरक्षा नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

कोविड-१९ चा प्रसार वाढू नये, यासाठी वाढदिवस, समारंभ, निवडणुका प्रचार, मिरवणुका, निदर्शने व मोर्चे यांच्यावरील निर्बंध कायम राहतील. सर्व प्रकारची सिनेमागृहे, नाट्यगृहे आणि मॉल्समधील मल्टीप्लेक्स पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. सर्व धर्मीयांची प्रार्थनास्थळे सुद्धा पुढील आदेशापर्यंत बंद राहतील. शाळा महाविद्यालयाच्या बाबतीत शालेय शिक्षण व उच्च शिक्षण विभागाकडून प्राप्त आदेश अस्तित्वात राहतील. रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत अत्यावश्यक कारणाशिवाय कोणालाही बाहेर पडता येणार नाही. सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे इत्यादी प्रमाणे सर्व कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करणे आवश्यक राहील.

या नियमांचे उल्लंघन केल्यास अशा व्यक्ती भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ अन्वये शिक्षापात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल व संबंधितावर सदर कलमानुसार व साथरोग अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था, संघटना यांच्यावर भारतीय दंड संहितेचे कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास पुढील आदेशापर्यंत प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे

कोई टिप्पणी नहीं

Blogger द्वारा संचालित.