एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन - apply for Eklavya model residential public school till 31 august
एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेशासाठी ३१ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
वाशिम, दि. ०३ (जिमाका) : सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात राज्यातील आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यान्वित इंग्रजी माध्यमाच्या सर्व एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता ६ वीच्या वर्गात नियमीत प्रवेश तसेच इयत्ता ७ वी ते ९ वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अनुसूचित, आदिम जमातीच्या विद्यार्थ्यांकडून ३१ ऑगस्ट २०२१ पर्यंत ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. त्यासाठी https://admission.emrsmaharashtra.com ही लिंक उपलब्ध करुन देण्यात आली आहे, असे अकोला एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पचे प्रकल्प अधिकारी राजेंद्रकुमार हिवाळे यांनी कळविले आहे.
प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांच्या पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी https://admission.emrsmaharashtra.com या लिंकवर उपलब्ध करुन देण्यात आलेले अर्ज ऑनलाईन भरून त्यासोबत मागील वर्षाचे गुणपत्रक अपलोड करावे. ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याकरिता अर्जदार विद्यार्थ्याचा सरल पोर्टलवरील ‘स्टुडंट आयडी’ (Student ID) माहिती असणे आवश्यक आहे.
आदिवासी विदयार्थ्यांना एकलव्य रेसिडेंशियल मॉडेल पब्लिक स्कूलमध्ये प्रवेशासाठीची परिक्षा कोरोनाच्या प्रार्दुभावामुळे रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील वार्षिक परिक्षेच्या गुणाच्या आधारे प्रवेश देण्यास शासनाने मान्यता दिली आहे. त्यानुसार शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये जे विदयार्थी इयत्ता पाचवीमध्ये प्रविष्ट होते आणि सध्या सदरील विदयार्थी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये इयत्ता सहावीमध्ये प्रवेशित झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांना एकलव्य निवासी शाळेत इयत्ता सहावीमध्ये प्रवेश घेण्याकरिता मागील वर्षाचे इयत्ता पाचवीचे गुणपत्रक ऑनलाईन आवेदन पत्रासोबत अपलोड करावे लागले. तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२२ करिता इ. ७ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे इ. ६ वीच्या वर्गाचे गुणपत्रक, तर इ. ८ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे इ. ७ वी च्या वर्गाचे गुणपत्रक आणि इ. ९ वी मध्ये प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांचे मागील वर्षाचे इ. ८ वी च्या वर्गाचे गुणपत्रक अपलोड करावे लागेल.
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापन व संकलित मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे (मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान किंवा परिसर अभ्यास समाजिकशास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण) प्रत्येकी १०० पैकी गुण विचारात घेऊन एकूण ९०० गुणांचे गुणपत्रक सादर करावे. तसेच शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये ज्या विद्यार्थ्यांची आकारिक मूल्यमापन प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. अशा विद्यार्थ्यांचे आकारिक मूल्यमापनाचे विषयनिहाय प्राप्त गुण १०० मध्ये रुपांतरित करुन संबंधित इयत्तेचे नऊ विषयांचे (मराठी, हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान किंवा परिसर अभ्यास समाजिकशास्त्रे, कला, कार्यानुभव व शारीरिक शिक्षण) प्रत्येकी १०० पैकी गुण विचारात घेऊन एकुण ९०० गुणांचे गुणपत्रक सादर करावे.
पालक, शिक्षक, मुख्याध्यापक यांनी ऑनलाईन अर्जासोबत वेबलिंकवर गुणपत्रक अपलोड करण्यापुर्वी ते गुणपत्रक ९०० गुणांचे असल्याची खात्री करावी. त्यामुळे शाळेकडून गुणपत्रक प्राप्त करुन घेताना गुणपत्रक तपासून घेण्यात यावे. शाळेकडून श्रेणी प्रदान केलेले गुणपत्रक मार्कामध्ये रुपांतरित करुन घ्यावे. श्रेणी नमुद कलेले गुणपत्रक प्रवेशासाठी ग्राह्य धरले जाणार नाही, असे श्री. हिवाळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.
Post a Comment