१५ ऑगस्टपूर्वी बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. Complete the target of crop loan
१५ ऑगस्टपूर्वी बँकांनी खरीप पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे- जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस.
वाशिम, दि.,६ (जिमाका) : जिल्ह्यातील कोणताही पात्र शेतकरी खरीप पीक कर्जापासून वंचित राहू नये. बँकांनी कोणत्याही परिस्थितीत पीक कर्जापासून वंचित असलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करून आपले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १५ ऑगस्टपर्यंत पूर्ण करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी दिले.
५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात सन २०२१-२२ या वर्षातील खरीप पीक कर्ज वाटपाचा बँकांकडून आढावा घेतांना श्री. षण्मुगराजन बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक शंकर कोकडवार तसेच बँकांचे जिल्हा समन्वयक यांची उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. षण्मुगराजन म्हणाले, शेतकऱ्यांना खरीप हंगामात वेळेत पीक कर्जपुरवठा करणे, ही बँकांची जबाबदारी आहे. आपल्या बँक शाखेअंतर्गत येत असलेला कोणताही शेतकरी हा पीक कर्जापासून वंचित राहू नये. त्याला वेळेत पीक कर्ज वाटप झाले पाहिजे. पीक कर्जापासून वंचित असल्याची कोणत्याही शेतकऱ्यांची तक्रार येणार नाही, याकडे बँकांनी लक्ष द्यावे. अनेक बॅंकांनी या खरीप हंगामात ५० टक्क्यापेक्षाही कमी पीक कर्ज वाटप केले आहे, ही खेदाची बाब आहे. ज्या बँकांनी पीक कर्ज कमी वाटप केले आहे, त्या बँकांमधून शासकीय ठेवी काढण्यात येतील.बँकांनी शेतकऱ्यांपर्यंत पोहोचून त्यांना पिक कर्ज उपलब्ध करून द्यावे, असे ते म्हणाले.
ज्या बँकांचे पीककर्ज वाटपाचे प्रमाण कमी आहे, त्या बँकांच्या प्रादेशिक व्यवस्थापकांना याबाबत अवगत करण्यात येईल,असे सांगून श्री. षण्मुगराजन म्हणाले, संबंधित बँकांनी नियोजन करून येत्या १५ ऑगस्टपूर्वी शेतकऱ्यांना खरीप पीक कर्ज वाटप करावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सन २०२१-२२ या वर्षातील खरीप हंगामात १ लाख ४ हजार ७९१ शेतकरी सभासदांना १ हजार २५ कोटी रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी ४ ऑगस्टपर्यंत ९० हजार ९४८ शेतकऱ्यांना ७५३ कोटी २३ लक्ष रुपये पीक कर्ज वाटप केले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया,इंडियन ओवरसिज बँक, बँक ऑफ बडोदा, कॅनरा बँक, सेंट्रल बँक इंडिया, युको बँक व युनियन बँक ऑफ इंडिया या राष्ट्रीयकृत बँकेत सोबतच ऍक्सिस बँक, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक व आयडीबीआय बँक या खाजगी बँकांना १५ ऑगस्टपूर्वी ९० टक्के पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तसेच ९० टक्क्यांपेक्षा जास्त पीक कर्ज वाटप केलेल्या विदर्भ कोकण ग्रामीण बँक व अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनी देखील आपले कर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती श्री. निनावकर यांनी यावेळी दिली.
Post a Comment