Header Ads

जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून खदान, क्रेशरची तपासणी - अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक विषयक तक्रारींची दखल Inspection of mines and crushers by district level flying squad



जिल्हास्तरीय भरारी पथकाकडून खदान, क्रेशरची तपासणी
अवैध गौण खनिज उत्खनन, वाहतूक विषयक तक्रारींची दखल

वाशिम, दि. २९ (जिमाका) : जिल्ह्यात अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यामुळे याअनुषंगाने आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी नुकत्याच दिल्या होत्या. त्यानुसार जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांच्या मार्गदर्शनाखाली अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांच्या नेतृत्वाखालील जिल्हास्तरीय भरारी पथकाने २८ जुलै रोजी तोंडगाव, तामसाळा व हिस्से बोराळा येथील ११ खदान, क्रेशरची अचानक तपासणी केली. यावेळी अवैध वाहतूक करतांना आढळून आलेल्या एका वाहनावर कारवाई करण्यात आली आहे.

अपर जिल्हाधिकारी श्री. पवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस, उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, भूमी अभिलेख विभाग यांच्या संयुक्त पथकाने २८ जुलै रोजी तोंडगाव येथील ४, तामसाळा येथील १ व हिस्से बोराळा येथील ६ खदान, क्रेशरची अचानकपणे भेट देवून तपासणी केली. या सर्व खदानधारक व क्रेशरधारकांनी परवाना दिनांकापासून आतापर्यंत किती प्रमाणात उत्खनन केले आहे, उत्खननाच्या अनुषंगाने स्वामित्वधनाचा किती भरणा केला आहे. तसेच ईटीएस मशीनद्वारे खदानीची मोजणी झाली असल्यास त्याची प्रत व ब्लास्टिंग ज्या व्यक्ती मार्फत करण्यात येते, त्या व्यक्तीच्या परवान्याची प्रत तत्काळ तहसीलदार कार्यालयात सदर करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. ब्लास्टिंगच्या अनुषंगाने प्राप्त तक्रारींची दखल घेवून संबंधित खदान व शेतीची पाहणी सुद्धा या पथकाने केली.

जिल्हास्तरीय भरारी पथकाने तोंडगाव- वाशिम मार्गावर गौण खनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकची तपासणी केली. या ट्रक चालकाकडील गौण खनिज वाहतूक पावतीची पडताळणी केली असता, सदर पावतीची वैधता संपली असल्याचे आढळून आले. हा ट्रक वाशिम पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आला असून या वाहनावर दंडात्मक कारवाई करण्याच्या सूचना वाशिमचे उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

जिल्हास्तरीय भरारी पथकामार्फत यापुढेही कारवाई होणार

गौण खनिजाचे अवैध उत्खनन तसेच अवैध वाहतूक रोखण्यासाठी जिल्हास्तरीय भरारी पथकामार्फत २८ जुलै रोजी वाशिम तालुक्यातील खदान व क्रेशरची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात यापुढेही अशा प्रकारे अचानक तपासणी करून अवैध वाहतूक व उत्खनन प्रकरणी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणीही अवैध उत्खनन अथवा अवैध गौण खनिज वाहतूक करू नये, असे आवाहन अपर जिल्हाधिकारी शहाजी पवार यांनी केले आहे.

वाशिम शहरातील अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी पथके तैनात

वाशिम शहरातील गौण खनिज, दगड, रेती, मुरूम, गिट्टी यांची अवैध वाहतूक रोखण्यासाठी पुसद नाका, नवोदय विद्यालय नाका व रिसोड नाका याठिकाणी वाशिम तहसील कार्यालयामार्फत पथके तैनात करण्यात आली आहेत. या पथकांनी गौण खनिज करणाऱ्या वाहनांची तपासणी करून अवैध गौण खनिज करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी. तसेच दैनंदिक कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश वाशिमच्या तहसिलदारांनी दिले आहेत.

No comments

Powered by Blogger.