Header Ads

बकरी ईदनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी. Guidelines issued on the occasion of bakari Eid



बकरी ईदनिमित्त मार्गदर्शक सूचना जारी

जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी केले आदेश निर्गमित

वाशिम, दि. १७ (जिमाका) :  कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून साथरोग अधिनियम १८९७ अन्वये वाशिम जिल्ह्यात बकरी ईद-२०२१ च्या अनुषंगाने मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. यांनी १५ जुलै रोजी याबाबतचे आदेश निर्गमित केले आहेत.

या आदेशात म्हटले आहे की, कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीमुळे राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यामुळे नागरिकांनी बकरी ईदची नमाज मस्जिद अथवा ईदगाह अथवा सार्वजनिक ठिकाणी अदा न करता आपल्या घरीच अदा करावी. सध्या कार्यान्वित असलेले जनावरांचे बाजार बंद राहतील. जनावरे खरेदी करावयाची असल्यास नागरिकांनी शक्यतो ऑनलाईन पध्दतीने किंवा दूरध्वनीद्वारे जनावरे खरेदी करावीत. शक्यतो प्रतिकात्मक कुर्बानी करावी. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत जिल्ह्यात लागू करण्यात आलेले निर्बंध तसेच त्यानंतर वेळोवेळी निर्गमित केलेल्या सूचनांनुसार इतर निर्बंध कायम राहतील. त्यामध्ये बकरी ईदनिमित्त कोणतीही शिथिलता देण्यात येणार नाही.

बकरी ईदच्या निमित्ताने नागरिकांनी कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये किंवा एकत्र जमू नये. कोविड विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय, शिक्षण विभाग तसेच संबधित नगरपालिका, पोलीस, स्थानिक प्रशासना यांनी विहित केलेल्या नियमांचे अनुपालन करणे बंधनकारक राहील. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिद्ध झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती, संस्था अथवा समूह यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अन्वये आणि भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ अन्वये शिक्षेस पात्र असलेला अपराध केला आहे, असे मानण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा समूह यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये गुन्हे दाखल करण्यासाठी संबंधित ठाण्याचे उपनिरीक्षक दर्जापेक्षा कमी नाही, अशा अधिकाऱ्यास प्राधिकृत करण्यात आल्याचे आदेशात म्हटले आहे.

No comments

Powered by Blogger.